तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

By विश्वास मोरे | Published: June 11, 2023 05:57 AM2023-06-11T05:57:24+5:302023-06-11T05:59:22+5:30

वैष्णवांच्या अभूतपूर्व उत्साहात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३८व्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र देहूगाव येथून शनिवारी पंढरीकडे प्रस्थान झाले.

ashadhi ekadashi wari sant tukaram palkhi leaves for pandhari of 338th celebration | तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

googlenewsNext

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, देहूगाव (जि. पुणे) :  ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग...’ विठूरायाच्या भेटीची आर्तता मनी बाळगून, टाळ मृदंग वाजती, वीणा झंकारती अन् तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती, अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत शनिवारी आली. वैष्णवांच्या अभूतपूर्व उत्साहात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३८व्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र देहूगाव येथून शनिवारी पंढरीकडे प्रस्थान झाले. यंदा मान्सूनने ओढ दिली असली तरी पालखी सोहळ्यात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या बीजमंत्राचा गजर सुरू असतानाच आलेल्या हलक्या सरींनी विठूचा भक्तिरंग गहिरा झाला. 

परंपरेनुसार पहाटे पाचला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज  मोरे, माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, आदी विश्वस्त उपस्थित होते. त्यानंतर साडेसहाला तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची व सात वाजता वैकुंठगमन मंदिरात विधिवत महापूजा संस्थानच्या विश्वस्थांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजविला होता.

बरसल्या सरी, आनंदले वैष्णव

- टाळ मृदंगाचा कल्लोळ टीपेला पोहोचला होता. नभात काळे ढग दाटून आले आणि हलक्याशा सरी बरसल्या. त्यामुळे वैष्णवांचा मेळा आनंदला. साडेतीनच्या सुमारास ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’ असा जयघोष करीत देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली.

- वीणामंडपातून अपूर्व उत्साहात पालखी बाहेर पडली. फुगड्या, दिंडेकऱ्यांचे खेळ रंगले. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली.

- सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर पालखी आजोळघरी इनामदार वाड्यात विसावली.


 

Web Title: ashadhi ekadashi wari sant tukaram palkhi leaves for pandhari of 338th celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.