"शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत 'मविआ'ला किंचितही धोका नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:42 PM2022-11-20T13:42:11+5:302022-11-20T13:42:21+5:30
सगळे सोडून अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल, व्यक्तीचा उल्लेख करून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये
बारामती : सावरकरांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत फूट पडेल असे वक्तव्य केले असले तरी जोपर्यंत राष्ट्रीय नेते शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. तोपर्यंत महाविकास आघाडीला किंचितही धोका नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे.
मला सावरकरांविषयी काहीही बोलायचे नाही. राजकीय नेतेगण, मीडियाने कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे हे ठरवले पाहिजे. राज्यात अनेक भीषण प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी वाढते आहे. राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात आहेत. अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला पीकविम्याचे पैसे, शासनाकडून मिळणे गरजेचे झाले आहे. हे सगळे सोडून अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल, व्यक्तीचा उल्लेख करून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले व्यक्त केले.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे मत व्यक्त केले. पवार म्हणाले, सध्याच्या सरकारने महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामांना स्थगिती दिली आहे. उड्डाणपूल, पूल व अन्य कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. वास्तविक या कामांना विधिमंडळ सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. अशी कामे थांबवणे उचित नाही, याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येक भेटीत सांगितले आहे. त्यांनी नवीन कामे सुरू करण्याबाबत आमचे दुमत नाही. परंतु मागील विकासाची कामे थांबवण्याचेही काही कारण नाही. सत्ता नेहमी बदलत असते. त्यामुळे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी कायम आपणच सत्तेत राहणार नाही, हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
कोणाला किती निधी द्यावा याचा अधिकार राज्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून ते काम करत आहेत. आता त्यात काय योग्य- अयोग्य हे जनतेने ठरवावे. राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांच्या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळल्याच्या प्रश्नावर काही माहिती नाही. मी रोज वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असतो. मध्यंतरी यासंबंधी बातम्या आल्यानंतर मी डॉ. कोल्हे यांच्याशी बोललो होतो. आमचे सातत्याने बोलणे होत असते. परंतु सध्याच्या बातम्यांबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेऊनच मी बोलेन, असे अजित पवार म्हणाले.