‘मोक्का’तील आरोपींना मदत करणाऱ्या साथीदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:57+5:302021-06-09T04:12:57+5:30

शाखेची कारवाई बारामती : मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या बाळा दराडे टोळीला फरार कालावधीत दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवत ...

Arrest of accomplice who helped the accused in 'Mocca' | ‘मोक्का’तील आरोपींना मदत करणाऱ्या साथीदाराला अटक

‘मोक्का’तील आरोपींना मदत करणाऱ्या साथीदाराला अटक

शाखेची कारवाई

बारामती : मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या बाळा दराडे टोळीला फरार कालावधीत दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवत मदत करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र ऊर्फ एक्का महादेव चौधरी (वय २०, रा. वंजारवाडी, ता. बारामती) असे या आरोपीचे नाव आहे. बाळा दराडे टोळीवर पोलिसांनी यापूर्वीच मोक्काची कारवाई केली आहे. या टोळीील फरार शुभम ओमप्रकाश खराडे याला गत आठवड्यातच स्थानिक गुन्हे शाखेने बारामती एमआयडीसी परिसरातून अटक केली होती. म्हसोबावाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत बाळा पोपट दराडे, विजय बाळू गोफणे, शुभम ओमप्रकाश खराडे व अन्य दोन अनोळखी आरोपींनी संजय तुकाराम थोरवे यांना बारामती शहर, तालुका व भिगवण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कारणावरून थोरवे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत लोखंडी रॉडने, गजाने मारहाण करत घरातील घड्याळ व रोख रक्कम जबरीने नेली होती. याप्रकरणी दराडे टोळीविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याच्या प्रयत्नांसह शस्त्र अधिनियम व दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणातील दराडे व गोफणे यांना बारामती तालुका पोलिसांनी नाशिकच्या पंचवटीमधून अटक केली होती. तपासामध्ये आरोपींविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली होती. चौधरी हा आरोपींना मदत करत होता. तो वंजारवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला वेषांतर करीत सापळा रचून पकडले. दरम्यान, आरोपीला पुढील कारवाईसाठी त्याला भिगवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार रविराज कोकरे, अनिल काळे, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, धीरज जाधव, दगडू वीरकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

फोटो ओळी : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने राजेंद्र चौधरी याला बारामतीत अटक केली.

०८०६२०२१-बारामती-१६

Web Title: Arrest of accomplice who helped the accused in 'Mocca'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.