मुळगावकर यांना लष्कराची मानवंदना
By Admin | Updated: April 12, 2015 00:35 IST2015-04-12T00:35:59+5:302015-04-12T00:35:59+5:30
एअर चिफ मार्शल (निवृत्त) हृषीकेश मुळगावकर यांच्यावर शनिवारी सायंकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुळगावकर यांना लष्कराची मानवंदना
पुणे : एअर चिफ मार्शल (निवृत्त) हृषीकेश मुळगावकर यांच्यावर शनिवारी सायंकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराने बॅन्ड वाजवून आणि बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्याअगोदर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव आर्मफोर्स मेडिकल कॉलेजमध्ये (एएफएमसी) दुपारी ठेवण्यात आले होते. तिथे लष्करातील आजी-माजी अधिकाऱ्यांनी मुळगावकर यांचे अंत्यदर्शन घेतले. एएफएमसीपासून गोळीबार मैदानाजवळील मुक्तीधाम स्मशानभूमीपर्यंत त्याचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या तोफेवर ठेवून नेण्यात आले.
मुळगावकर यांच्यावर त्यांच्या मुलाने अंत्यविधी केला. मुळगावकर यांचे गुरुवारी रात्री निधन झाले होते. त्यानंतर आज त्यांचे पार्थिव दुपारी दोनच्या सुमारास एएफएमसीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लष्कराच्या तिन्ही दलांकडून त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
वायुसेनच्या दक्षिण-पश्चिम विभागाचे वरिष्ठ एअर स्टाफ आॅफिसर एअर मार्शल सी. हरी कुमार व लोहगाव विमानतळाचे प्रमुख एअर कमोडोर ए. के. भारती यांनी वायुसेनेच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. सायंकाळी चारच्या सुमारास फुलांनी सजविलेल्या तोफेवर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आणि तेथून ते मुक्तीधाम स्मशानभूमीत आणण्यात आले. तिथे त्यांना वायुसेनेच्या जवानांनी बॅन्ड वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीतही गर्दी होती.
(प्रतिनिधी)