पुणे : शहरातील काही भागांमध्ये पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. या बाबतची माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आली. चतुःश्रृंगी वाहतूक विभागांतर्गत औंध डीपी रोडवरील ज्ञानेश्वर मुरकुटे कमान येथून पायल टेरेस सोसायटी विधाते वस्तीकडे जाणारा मार्ग हा एकेरी वाहतूक करण्यात आला आहे. तसेच विधाते वस्ती पायल टेरेस सोसायटी येथून ज्ञानेश्वर मुरकुटे कमान औंध डीपी रोडला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहनांनी पायल टेरेस सोसायटी येथून डावीकडे वळण घेऊन टेरेझा पार्क सोसायटी मार्गे किंवा उजवीकडे वळण घेऊन शारदा पार्क सोसायटी मार्गे इच्छित स्थळी जावे.
नांदेडसिटी वाहतूक विभागांतर्गत नांदेड सिटी गेटच्या दोन्ही बाजूस ५० मीटर व गेट समोरील रोडच्या दोन्ही बाजूस ५० मीटर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत सातारा रोड पूजा सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर डाव्या बाजूला २० मीटर व उजव्या बाजूला २० मीटर असे एकूण ४० मीटर सर्व प्रकारच्या वाहनांना नो- पार्किंग झोन करण्यात आले आहे. दरम्यान, दत्तवाडी वाहतूक विभागांतर्गत स्व. शंकरराव कावरे उद्यान तावरे कॉलनी बाहेरच्या बाजूस उद्यानाच्या भिंतीलगत गेटच्या डाव्या बाजूला २० मीटर व गेटच्या उजव्या बाजूला २० मीटर फक्त दुचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन करण्यात आला आहे. दरम्यान, या वाहतूक बदलाबाबत काही सूचना असतील तर नागरिकांनी २४ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान लेखी स्वरूपात येरवडा येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयास कळवाव्यात असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.