चाकण नगर परिषदेची पहिली निवडणूक जाहीर
By Admin | Updated: September 30, 2015 01:32 IST2015-09-30T01:32:48+5:302015-09-30T01:32:48+5:30
राज्य निवडणूक आयोगाने नव्याने अस्तित्वात आलेल्या चाकण नगर परिषदेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक व जुन्नर, भोर आणि इंदापूर नगर परिषदांच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

चाकण नगर परिषदेची पहिली निवडणूक जाहीर
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने नव्याने अस्तित्वात आलेल्या चाकण नगर परिषदेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक व जुन्नर, भोर आणि इंदापूर नगर परिषदांच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. येत्या १ आॅक्टोबरपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून, १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
चाकणच्या सार्वत्रिक व जुन्नर, भोर आणि इंदापूर नगर परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी अधिसूचना जाहीर केली. यानुसार १ ते ८ आॅक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारणे, ९ आॅक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी करणे, १९ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
त्यानंतर १ नोव्हेंबरला मतदान होऊन २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या चाकण नगरपरिषदेची ही पहिलीच
सार्वत्रिक निवडणूक होत असून, खेड तालुक्यात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत आजी-माजी आमदारांमध्ये राजकीय रणधुमाळी रंगणार आहे.
चाकणच्या २३ जागांसाठी व इंदापूर नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक ३-ड, भोर- प्रभाग क्रमांक ४-ड आणि जुन्नर-प्रभाग क्रमांक २-अ साठी पोटनिवडणूक होत आहे. (प्रतिनिधी)
------------
१ ते ८ आॅक्टोबर : अर्ज भरणे
९ आॅक्टोबर : छाननी
१९ आॅक्टोबर : माघार
३० आॅक्टोबर : वैध अर्ज जाहीर,
चिन्हवाटप.
१ नोव्हेंबर : मतदान
२ नोव्हेंबर : मतमोजणी
---------------
भोर नगरपलिकाच्या प्रभाग क्रमांक ४ (ड)च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी भोरच्या माजी नगराध्यक्षा दीपाली शेटे यांचे नगरसेवकपद रद्द केल्याने निवडणूक जाहीर झाली आहे.
------------
चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली. मात्र, प्रभाग रचना व मतदार यादीतील घोळ संपला नसल्याने अनेक जण निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात न्यायालयात जाण्याची
शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभाग रचना व मतदार यादीतील नोंदी याबाबत संबंधितांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रभाग रचनेची सुरुवात उत्तर पूर्वच्या मध्य ईशान्य कोपऱ्यातून करण्याऐवजी पश्चिम बाजूने केली असल्याने प्रभागरचना सदोष असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे अतुल देशमुख व राजन परदेशी यांनी व्यक्त केले.