अंगणवाडीतील पोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:06+5:302021-06-09T04:13:06+5:30
बारामती: अंगणवाडी केंद्रांना दिला जाणारा पोषण आहार कोऱ्हाळे खुर्द येथील बागवान मळा येथे एका झाडाझुडपात हा पोषण आहार ...

अंगणवाडीतील पोषण
बारामती: अंगणवाडी केंद्रांना दिला जाणारा पोषण आहार कोऱ्हाळे खुर्द येथील बागवान मळा येथे एका झाडाझुडपात हा पोषण आहार आढळून आला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिका सिंधू झुंबर होले (रा. पणदरे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.
सिंधू होले या मागील नऊ महिन्यांपासून होळ बिटमध्ये पर्यवेक्षिका म्हणून काम करतात. अंगणवाडी केंद्राकडे शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दर ५० दिवसांनी ३ ते ६ वर्षे पटावरील लहान मुले, मुली, ६ महिने ते ३ वर्षे गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके, शाळाबाह्य किशोरवयीन मुली यांना मीठ, मिरची, मूगदाळ, मसूरदाळ, चणा, साखर, हळद, मटकी, गहू, चिक्की असा पोषण आहार दिला जातो. तो अंगणवाडी सेविकांना दिला जातो. दि. ३ जून रोजी बारामतीचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी फोनवरून शालेय पोषण आहाराची पॅकेट कोऱ्हाळे खुर्द येथे झाडाझुडपात पडल्याचे फिर्यादीने कळवले. त्यानुसार सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक नवले, विस्तार अधिकारी विलास बंडगर, कोऱ्हाळे खुर्द येथील अंगणवाडी सेविका कविता जायपत्रे, प्रभावती माळशिकारे, रेखा भोसले यांना घेऊन होले बागवान मळा येथे गेल्या असता तेथे एका झुडपाच्या खाली लिंबाच्या वाळलेल्या पाल्याखाली पोषण आहार झाकलेला दिसून आला. या ठिकाणी सुमारे सहा हजार रुपयांचा पोषण आहार मिळाला. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.