दुष्काळावर ‘रेन हार्वेस्टिंग’ची मात्रा

By Admin | Updated: January 10, 2017 03:31 IST2017-01-10T03:31:17+5:302017-01-10T03:31:17+5:30

उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशांना करावी लागणारी भटकंती आता थांबणार आहे. राज्य सरकारने पावसाळ्यात पडणारे पाणी साठवून त्याचा पुरवठा मार्च ते

The amount of 'Rain Harvesting' on Drought | दुष्काळावर ‘रेन हार्वेस्टिंग’ची मात्रा

दुष्काळावर ‘रेन हार्वेस्टिंग’ची मात्रा

विशाल शिर्के / पुणे
उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशांना करावी लागणारी भटकंती आता थांबणार आहे. राज्य सरकारने पावसाळ्यात पडणारे पाणी साठवून त्याचा पुरवठा मार्च ते एप्रिल या काळात करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत राज्यातील ८ जिल्ह्यांतील ८९ गावांत विशेष टाक्यांची उभारणी करण्यात येणार असून, येत्या मार्चअखेरीस हा प्रकल्प मार्गी लागेल.
राज्यात मार्च महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणविण्यास सुरुवात होते. डोंगर-वाड्यांतील नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी टंचाईग्रस्त गावांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५०० अथवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे अथवा वाड्या-वस्त्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे, सातारा, नगर, जळगाव, नांदेड, अमरावती, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविण्यात येईल.
झिंक-अ‍ॅल्युमिनियम या मिश्रधातूची टाकी येथे बसविण्यात येईल. तिला आतून विशिष्ट पद्धतीचे अस्तर असेल. त्यामुळे पावसाळ्यात साठविलेले पाणी उन्हाळ्यातदेखील वापरणे शक्य होईल. पावसाळ्यातील पाणी साठविण्यासाठी टाकीवर खास सोय करण्यात येणार आहे. याशिवाय तेथील नैसर्गिक झरे, विहिरी, बोअरवेल यांतील जास्तीचे पाणीदेखील साठवून ठेवण्याची सोय त्यात उपलब्ध असेल. या पाण्याचा वापर उन्हाळ्यातील शेवटच्या ९० दिवसांसाठी केला जाईल.
या टाकीच्या जोडीला एक दिवसाचा पाणीपुरवठा करता येईल, अशी जोडटाकी असेल. या माध्यमातून पाण्याचे क्लोरिनेशनदेखील करता येणार आहे. पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनुसार आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत ही टाकी भरण्यात येईल. दुष्काळात गावाच्या विहिरीत पाणी सोडले जाते; मात्र त्यातील बरेच झिरपून जाते. तर, अनेकदा गाळमिश्रित पाणी होते. त्यामुळे या एका टाकीचा उपयोग विविध प्रकारे पाण्याच्या साठविण्यासाठी करता येणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली.
गावाच्या लोकसंख्येनुसार तीन ते पाच लाख लिटर क्षमतेची ही टाकी असेल. त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी गावातील महिला बचत गट अथवा शेतकरी गटासारख्या अन्य गटाकडे असेल, असेही पाटील म्हणाले.

Web Title: The amount of 'Rain Harvesting' on Drought