रुग्णवाहिकाचालकांचे थकीत वेतन मिळणार
By Admin | Updated: June 12, 2017 01:11 IST2017-06-12T01:11:39+5:302017-06-12T01:11:39+5:30
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेवर असणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांचे वेतन ७ महिने उलटूनही मिळालेले नव्हते

रुग्णवाहिकाचालकांचे थकीत वेतन मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेवर असणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांचे वेतन ७ महिने उलटूनही मिळालेले नव्हते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेऊन त्यांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे. त्याचे अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिका वाहनचालकांच्या अनेक सुखसोर्इंकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने ठरवून दिलेली सर्व कामे, प्रसूतीची संख्या वाढवण्यासाठी प्रसूतीमातांना रात्रंदिवस केव्हाही आणणे व सोडणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम पल्स पोलिओ आदी कामे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सर्व रुग्णांना आणणे व सोडणे अशी २४ तास कामे प्रामाणिकपणे करतात. त्यासाठी त्यांना ७ हजार १५० रुपये इतके अल्प वेतन मिळते. परंतु, अनेक वेळा वाहनचालकांवर येणाऱ्या अडीअडचणी वरिष्ठ अधिकारी वर्गाला सांगूनदेखील याची दखल घेतली जात नाही. यामुळे वाहनचालकांवर वेतनाअभावी अन्याय होत आहे. यामुळे वाहनचालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामाच्या प्रमाणात वेतन वाढवून समान वेतन अधिकारानुसार किमान वेतन मिळावे यासाठी कंत्राट पद्धत बंद करून आम्हाला जिल्हा परिषदेकडून वेतन द्यावे. दर वर्षी नवीन ठेकेदारांना ठेका दिला जात आहे. यामुळे वाहनचालकांनाच माहीत होत नाही, की आपला ठेकेदार कोण आहे? ठेकेदारांना दरवर्षी वेतन वाढवून दिले जाते. परंतु, वाहनचालकांच्या वेतनात कोणत्याही प्रकारची वाढ केली जात नाही. तसेच ठेकेदार त्यांचा भविष्य निर्वाह निधीही भरत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात काम करीत असताना वाहनचालकांना गणवेश, ओळखपत्राची आवश्यकता असते. याची पूर्तता करणे आवश्यक आहे.