Alot crowd wakad-hinjewadi bogad enthusiasm | अलोट गर्दीत वाकड-हिंजवडीत बगाड उत्साहात
अलोट गर्दीत वाकड-हिंजवडीत बगाड उत्साहात

४वाकड : वाकड-हिंजवडीचे ग्रामदैवत, पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. खोबरे, भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी ‘म्हातोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.

४हिंजवडी गावठाणातील होळी पायथा मैदानापासून मिरवणुकीस सुरवात झाली. सांगता वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात झाली. बगाडासाठी गळकरी होण्याचा मान हिंजवडीतील जांभूळकर वाड्यातील तरुणाचा असतो. बगाडाचा रथ रिंगण मैदानात आल्यानंतर किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्याच्या नावाची घोषणा केली. गळकरी होण्याचा मान नीलेश दत्तात्रय जांभूळकर यांना मिळाला, तर दत्तात्रय विठ्ठल साखरे आणि सतीश बाळासाहेब साखरे यांना खांदेकरी होण्याचा मान मिळाला.

४कडाडणाऱ्या हलगीच्या नादात ‘पैस..पैस, म्हातोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात नेण्यात आले. तेथे मानाची कावड गेल्यानंतर गळकऱ्याच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांची माळ आबा पारखी यांनी टाकली. येथे म्हातोबाचे दर्शन घेऊन खांदेकऱ्यांच्या साह्याने मारुती मंदिरात नेण्यात आले. पाचच्या सुमारास हजारो भाविकांच्या तुफान गर्दीत खांदेकऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले. येथे हिंजवडी गावच्या वतीने संदीप पंढरीनाथ साखरे आणि वाकड गावच्या वतीने सुतार समाजातील मानकरी पांडुरंग सुतार यांनी गळकऱ्याला गळ टोचला.

४गळ टोचलेल्या नीलेश यांना रिंगण मैदानात नेऊन बगाडावर बसवून हजारो भाविकांच्या साक्षीने पाच गोल फेऱ्या मारण्यात आल्या. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आयटी अभियंत्यांचे हात उंचावले होते. गळकऱ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक आटापिटा करीत होते. अनेक जण त्यासाठी उंच ठिकाणी गेले. पुढे ही मिरवणूक हिंजवडी, भूमकर वस्ती, केमसे वस्ती वाकडकर वस्ती, भुजबळ वस्ती येथून मार्गस्थ झाली. वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात मिरवणुकीची सांगता करून गळकऱ्याला मंदिरात नेण्यात आले.

Web Title: Alot crowd wakad-hinjewadi bogad enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.