शिक्रापूर : शिरूर, आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असून दीड महिन्यात शिरूर तालुक्यात तीन बालकांचा बळी गेला असून बिबट्यांचा बंदोबस्त होत नसेल तर बिबट्यांना गोळ्या घालण्याची परवानगी द्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य विभागाकडे केली आहे.
शिरूर तालुक्याला वनपरिक्षेत्र अधिकारीच नसून अन्य कर्मचाऱ्यांची देखील संख्या कमी असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरा, तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करत बिबट्यांचा बंदोबस्त होत नसेल तर बिबट्यांना गोळ्या घालण्याची परवानगी द्या, अशी मागणी संजय पाचंगे यांनी केली आहे. शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागामध्ये मनुष्यासह पशुधनावर बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना अलीकडील काळात दीड महिन्यात तीन लहान बालकांचा बळी बिबट्याने घेतला असून, हजारो पशुधानांवर देखील हल्ले करून ठार केल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच शिरूर तालुक्याला मुख्य असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी पदच रिक्त आहेत, तर अनेक वनपाल व वनरक्षकासह वनविभागाच्या जागा रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. त्याचबरोबर बिबट्यांचा हल्ल्यातील बळी गेलेल्यांच्या नातेवाइकांना पन्नास लाख रुपये, गाय, म्हैस यांना एक लाख रुपये, तर शेळ्या, मेंढ्यांना पंचवीस हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.