पुणे: बीड प्रकरणावरून आरोपांची राळ उडत असतानाच मंत्री संजय शिरसाठ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अंजली दमानिया सातत्याने बोगस आरोप करत असतात. त्यांच्या आरोपांमध्ये जर काही तथ्य असेल, तर त्यांनी ते पुरावे पोलिसांकडे सादर करावेत. फक्त बेछूट आरोप करून गोंधळ माजवण्यात काही अर्थ नाही,” असे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.
शिरसाठ पुढे म्हणाले, “जर हत्या झाल्या आहेत, तर मृतदेह कुठे आहेत? या बेछूट आरोपांमुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, आणि यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही.” या प्रकरणी सहा विविध तपास यंत्रणा काम करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
“माहिती असल्यास पोलिसांना द्या”
दमानियांवर निशाणा साधताना, “त्यांच्या बोगस आरोपांमुळे वातावरण बिघडते आहे. जर त्यांच्याकडे काही ठोस माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांना दिली पाहिजे. सरकार खोट्या आरोपांमुळे कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, सत्य समोर आले, तर आरोपींना नक्कीच कठोर शिक्षा होईल.” असे आवाहन शिरसाठ यांनी केले.
पुण्यातील वसतिगृहांची पाहणी व भीमा कोरेगाव सोहळ्याचा आढावा
संजय शिरसाठ यांनी आज पुण्यातील वसतिगृहांची पाहणी केली. त्यांनी या ठिकाणी झालेल्या पाहणीनंतर समाधान व्यक्त केले, मात्र काही त्रुटींवरही लक्ष वेधले. “सगळे नीट सुरू आहे, पण जिथे त्रुटी आहेत, तिथे त्या लवकरच दूर केल्या जातील,” असे ते म्हणाले.
आजच त्यांच्या खात्याची एक महत्त्वाची बैठक देखील पुण्यात घेण्यात आली. या बैठकीत भीमा कोरेगाव सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शिरसाठ म्हणाले, “या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आमच्या खात्याने १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.”
“कारभारात ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही”
संजय शिरसाठ यांनी वसतिगृह व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिला की, “कारभार नीट होत नसेल तर कुणालाही सोडले जाणार नाही. वसतिगृह व्यवस्थापनात त्रुटी असल्यास त्वरित दुरुस्त्या करण्यात याव्यात.”
त्यांनी भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. “सगळ्या तयारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, कारण हा सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.