All year sweetness of ukdiche modak' | '' हातवळणीच्या उकडीच्या मोदकांची '' बारमाही गोडी..

'' हातवळणीच्या उकडीच्या मोदकांची '' बारमाही गोडी..

ठळक मुद्देपुण्यात वर्षभरात 15 लाखांपेक्षाही अधिक मोदकांची विक्री मोदकांचे तळलेले, नारळाचे, खव्याचे, बालुशाही, चॉकलेट, पिस्ता, मँगो असे नानाविविध प्रकार

पुणे : ’संकष्टी चतुर्थी’, गणेशजयंती’, विनायकी चतुर्थी’,  ‘अंगारकी’ आणि  ‘गणेशोत्सव’ या दिवसांव्यतिरिक्तही आता उकडीच्या मोदकांची ’बारमाही’ गोडी पुणेकरांना लागली आहे. कुणाचा वाढदिवस असो किंवा गेट टूगेदर असो किंवा कुणी घरी जेवायला येणार असो अशावेळी हातवळणीच्याच उकडीच्या मोदकांना अधिकांश पसंती दिली जात असल्याने मोदकांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. पुण्यात वर्षभरामध्ये घरगुती, मिठाईची दुकाने, व्यावसायिक यांच्या माध्यमातून जवळपास 15 लाखांपेक्षाही अधिक मोदकांची विक्री होत आहे.  
आजमितीला मोदकांचे तळलेले, नारळाचे, खव्याचे, बालुशाही, चॉकलेट, पिस्ता, मँगो असे नानाविविध प्रकार उपलब्ध असले तरी हातवळणीच्या उकडीच्या मोदकांनाच ग्राहकांकडून अधिक मागणी आहे.  पूर्वीच्या काळी चतुर्थी आणि गणेशोत्सव काळात घरोघरी मोदक करण्याची प्रथा होती. मात्र नोकरीनिमित्त महिलांनी घराचा उंबरठा ओलांडल्यामुळे ही प्रथा कालपरत्वे  कमी झाली आहे. त्यामुळेचं गेल्या काही वर्षात तयार मोदकांच्या खरेदीकडेच कुटुंबांचा कल वाढला आहे. पुण्यातील बहुतांश गृहिणींनी घरबसल्या मागणीनुसार उकडीचे मोदक तयार करून देण्याच्या व्यवसायात पाय रोवायला सुरूवात केली आणि आज त्याची एक बाजारपेठच आकाराला आली आहे. संकष्टी किंवा गणेशोत्सव वगळताही वर्षभर हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना प्रचंड मागणी असून, दिवसेंदिवस ही मागणी वाढतच चालली आहे. एका मोदकाचे मूल्य हे 22 ते 35 रूपयांच्या घरात आहे. मोदकाच्या आकारानुसार त्याचा दर ठरलेला असतो.  एका गृहिणींचे वर्षभरात जवळपास दीड ते दोन हजार मोदक  तर मिठाई दुकानं आणि व्यावसायिक यांच्या मार्फत दिवसाला 5 हजार मोदकांची विक्री होते. यावरून मोदकाच्या आर्थिक उलाढालीचा नक्कीच अंदाज येऊ शकतो. अनेक महिलांना उकडीच्या मोदकांमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. याविषयी काही धरगुती मोदक आॅर्डरनुसार तयार करून देणा-या महिला आणि व्यावसायिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. 
विद्या ताम्हणकर म्हणाल्या, मोदक हा पदार्थ असा आहे की तो पचायला हलका आहे. त्यामुळे मोदकाला गोड पदार्थ म्हणून नेहमीच पसंती दर्शविली जाते. वर्षभरात मोदकांना खूप मागणी असते. मी वर्षभरात दीड ते दोन  हजार मोदक करते.   मोदक करणं हे खूप कष्टाचं काम असल्यामुळे आॅर्डरनुसारच  मोदक तयार करून दिले जातात. त्यासाठी उकड नीट होणं आवश्यक असतं. मोदक वळणं आणि कळीदारं होणं हे देखील कौशल्याचं काम आहे.मोदकं  दोन दिवसं आधी करून ठेवता येत नाही. नारळं खरवडणं, सारणं करणं, उकड काढणं, मळणं या गोष्टी कराव्या लागतात.या व्यवसायामुळे घराला काहीप्रमाणात हातभार लागत आहे. साधारण मोदकाव्यतिरिक्तही ’रेम्बो’ मोदक  मी करते. गौरीच्या दिवशी याला मागणी असते. उकडीच्या मोदकांचा साईज हा मोठा असल्याने 30 रूपये दराने मोदक विकते. 
माधुरी वराडे यांनी उकडीच्या मोदकाला ‘बारमाही’ मागणी असल्याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, मी गेल्या वर्षीपासूनच उकडीचे मोदक तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. पण मोदकांना मागणी नाही असा एकही दिवस गेलेला नाही. वर्षभरात दोन ते तीन हजार मोदकांची विक्री होते. 
हॉटेल व्यावसायिक किशोर सरपोतदार म्हणाले, आमच्याकडे दररोज 2 हजार उकडीच्या मोदकांची विक्री होते. चतुर्थीला लागणारा मोदक सर्व बाजारपेठेत आज उपलब्ध आहे. मोदकाला इतकी मागणी आहे म्हणूनच तो विकला जातो. जिथे गणपती मंदिर असतात त्याच्या आसपास च्या दुकानांमध्ये उकडीचे मोदक दिले जातात. याशिवाय आठवड्याला 10 हजार मोदक हे पुण्याबाहेर जातात. घरगुती महिलाही मोदक तयार करतात. आमच्यासारखेच इतर व्यवासायिक दिवसाला 3 हजार मोदक इतर दिवशी विकतात. चतुर्थीला हे मोदक 15 हजार जातात. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसात आमचे सव्वा लाख मोदक जातात. वर्षभर मोदकांना मागणी असते.  एका मोदकाची किंमत दुकानांमध्ये 22 ते 25 रूपये तर घरगुती किंमत 30 रूपये आहे. मोदकांच्या वाढत्या मागणीमुळे आर्थिक बाजारपेठ तयार झाली आहे, यात शंकाच नाही. 
--------------------------------------------------
उकडीच्या मोदकांना महागाईचा फटका 
कोकणातल्या स्थितीमुळे नारळ महागला आहे. गूळ आणि तांदूळाच्या पिठीचे भावही वाढलेले आहेत. नारळ आणि मजुरीमध्ये झालेली वाढ याचा फटका मोदकांना बसल्यामुळे एका नगामागे मोदकांमध्ये 2 रूपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 

Web Title: All year sweetness of ukdiche modak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.