पुणे - माजी केंद्रीयमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, मी ज्यावेळी बैठकीला पोहोचलो, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीच या बैठकीला हजर नव्हते, असे म्हणत पवार यांनी मोदींना लक्ष्य केलं. तसेच मोदी हे बैठकीपेक्षा प्रचारात मग्न असल्याचंही पवार म्हणाले.
काश्मीरच्या पुलवामा येथे जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडवून आणला. या भ्याड हल्ल्यात CRPF चे 39 जवान शहीद झाले. त्यानंतर, देशभरातून या दहशतवादी कृत्याचा निषेध करण्यात आला. तर, भारतीयांनी तीव्र भावना व्यक्त करत पाकिस्तानला धडा शिकवण्याचीही मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना बोलाविण्यात आले होते. मात्र, या बैठकीला मोदीच गैरहजर होते. यावरुन राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींवर टीका केली. आम्हाला मोदींकडून सर्वपक्षीय बैठकीचे आमंत्रण मिळाले होते. पण, ज्यावेळी मी या बैठकीला गेलो, त्यावेळी मोदीच बैठकीला गैरहजर होते. वास्तविक पाहता पंतप्रधानांनी या महत्त्वाच्या बैठकीला हजर राहणे, आवश्यक होते. मात्र, मोदी धुळे आणि यवतमाळ येथील प्रचारसभेत आमच्यावर टीका करण्यात व्यस्त होते, असे म्हणत पवार यांनी मोदींच्या धोरणाबद्दल त्यांना लक्ष्य केलं.
शिवसेना आणि भाजपामधील युतीबाबत प्रतिक्रिया विचारली असता, शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या युतीमध्ये आश्चर्य असे काही नाही. त्यांच्यातील युती होणारच होती.'' यावेळी शिवसेना आणि भाजपा युती 45 जागा जिंकेल अशा अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावरूनही शरद पवार यांनी युतीला टोला लगावला. शिवसेना आणि भाजपा युतीला 45 काय 48 पैकी 48 जागाही मिळतील, असे ते म्हणाले.
पार्थ अजित पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झाले आहेत. पक्षानं आदेश दिल्यास मावळमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहू, असं त्यांनी कालच म्हटलं होतं. मावळ मतदारसंघाचा भाग असलेला पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात अजित पवारांना मोठं पाठबळ आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकला असता. त्यामुळे पार्थ राजकीय आखाड्यात उतरणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र शरद पवार यांनी पार्थ निवडणूक लढवणार नसल्याचं आज जाहीर केलं. पार्थ आणि रोहित पवार निवडणूक लढवणार नाहीत, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ आणि रोहित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. या चर्चेला शरद पवार यांनी अखेर पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे पक्षानं संधी दिल्यास मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं विधान अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी कालच केलं होतं.