शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय एल्गार
By Admin | Updated: January 29, 2017 03:55 IST2017-01-29T03:55:50+5:302017-01-29T03:55:50+5:30
जुन्नर तालुका बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने ग्रामीण संस्कृती बैलगाडा शर्यत व गोवंश टिकण्यासाठी बैलगाडा शर्यतबंदी व पेटा या संघटनेच्या विरोधात नारायणगाव

शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय एल्गार
नारायणगाव : जुन्नर तालुका बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने ग्रामीण संस्कृती बैलगाडा शर्यत व गोवंश टिकण्यासाठी बैलगाडा शर्यतबंदी व पेटा या संघटनेच्या विरोधात नारायणगाव येथे पुणे-नाशिक महामार्गावर निषेध मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ याप्रसंगी सर्वपक्षीय प्रमुखांनी व बैलगाडामालक संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन जुन्नरचे तहसीलदार आशा होळकर यांना दिले. बैलगाडा शर्यतींचा अध्यादेश शासनाने येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत न काढल्यास शिवजयंतीला आपला आमदारकीचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला जाईल़, अशी घोषणा मनसेचे राज्यातील एकमेव आमदार असलेले जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथे केली़
बैलगाडा शर्यतबंदीविरोधात नारायणगावला शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येत शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाप्रसंगी जि़ प़ सदस्या आशाताई बुचके, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा सेना अध्यक्ष गणेश कवडे, शिवसेना जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, मनसे उपजिल्हाप्रमुख मकरंद पाटे, भाजपा उपाध्यक्ष नामदेव अण्णा खैरे, माजी जि़ प़ सदस्या राजश्री बोरकर, उपसरपंच जंगल कोल्हे, तालुका संघटक योगेश (बाबू) पाटे, संतोष वाजगे, विजय जाधव (सांगलीकर), जिल्हा बैलगाडा अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर, जुन्नर तालुका बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष राकेश खैरे, राहुल बनकर, राजेश कानडे, सोनाली पाटे, प्रकाश कबाडी, शरद पाचपुते, विलास भुजबळ, अप्पा भेगडे, गणेश भोसले, सचिन घोलप, काळूराव गावडे, अक्षय ढमढेरे, रमेश कोल्हे, राहुल ढोबळे, बाळासाहेब टेमगिरे, गुलाब पाखरे, सोमनाथ डुंबरे, बबन दांगट, संतोष चव्हाण, वैभव कोरडे, माऊली शेटे, तोसिफ कुरेशी आदी गाडामालक, चालक, शेतकरी व पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अतुल बेनके म्हणाले, ‘‘पक्षांचे विचार वेगळे असले तरी बैलगाडा निर्णयाबाबत आम्ही सर्वजण एकत्र आहोत़ शासनाने लोकहिताचा निर्णय घ्यावा़ आचारसंहितेचे कारण योग्य नाही़ पेटा संघटना प्राणी मित्र म्हणते; मात्र बैलांना गाडामालक व शेतकरी मुलाप्रमाणे जीव लावतात़ असे असताना पेटा संघटना बैलगाडा शर्यतींना विरोध करते, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ आनंदावर विरजण घालणे आम्हाला मान्य नाही़ लोकहिताचा निर्णय शासनाने घ्यावा.’’
सत्यशील शेरकर म्हणाले, की बैलांच्या माध्यमातून अनेकांच्या प्रपंचाला आधार मिळालेला आहे. तीन वर्षांपासून बैलगाडा शर्यती बंद आहेत़ राज्यात १ लाख ८० हजार बैलगाडे आहेत़ बैलगाडा शर्यती या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंद देणारा एक विरंगुळा आहे़ सर्व शेतकरी बैलांना आपल्या मुलाप्रमाणे जीव लावतात. असे असताना बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणे योग्य नाही़ राज्य शासनाने लवकरात लवकर बैलगाडा शर्यतीवर अध्यादेश काढावा, असे आवाहन त्यांनी केले़
या वेळी माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, राजश्री बोरकर, मकरंद पाटे, नामदेव अण्णा खैरे, बाळासाहेब टेमगिरे, विजय जाधव, रामकृष्ण टाकळकर यांच्यासह आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले़
हेमंत कोल्हे, उमेश कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. राकेश खैरे यांनी आभार मानले़ नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहा़ पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मंचरला आज आंदोलन : बैलगाडामालक एकत्र
मंचर : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठावी या मागणीसाठी मंचर येथे बैलगाडामालक रविवारी (दि. २९) आंदोलन करणार आहेत. शहरातून मोर्चा काढून पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठावी, पेटा संस्थेवर बंदी यावी, या मागणीसाठी बैलगाडामालक आंदोलन करीत आहे. आंबेगाव तालुक्यातील बैलगाडामालक, शौकीन तसेच बैलगाड्यांशी निगडित सर्व व्यावसायिक रविवारी मंचर शहरात आंदोलन करणार आहे. पिंपळगाव फाटा येथून मोर्चा निघणार आहे. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा लक्ष्मी रस्तामार्गे बसस्थानकाजवळ येणार आहे. तेथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तालुक्यातून बैलगाडामालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहे.
तमिळनाडूपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची सांगता महाराष्ट्रातील शेतकरी करील़. आपल्याला सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेले आहे़ आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे दरवाजे उघडले नाही आणि दि़ १९ फेब्रुवारीपर्यंत शासनाने अध्यादेश काढला नाही, तर आमदारकीचा राजीनामा देऊ. आमदार महेश लांडगे, सुरेश गोरे, राहुल कुल व आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैलगाडा शर्यतीबाबत दिल्लीत बोलून निर्णय घ्यावा, अशी चर्चा केलेली आहे़ बैल हा शेतकऱ्यांचा मित्र असून बैलगाडा बंदीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे़ अध्यादेश काढण्यासाठी आचारसंहितेचे कारण योग्य नाही. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले़
- शरद सोनवणे, आमदार
तमिळनाडू सरकारने शेतकऱ्यांची हाक ऐकून तेथील निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील निर्णय झालाच पाहिजे़ बैलगाडामालक आता पेटला असून, आता मरायची वेळ संपली असून मारायची वेळ आली आहे़ शासनाने बैलगाडा शर्यतीबाबत निर्णय घेतला नाही, तर मंत्र्यांच्या गाडया रस्त्यावर फिरू देणार नाही़ शासनाने ४८ तासांत बैलगाडा शर्यतीबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा पुढचे आंदोलन होईल. त्यात हजारो महिला सहभागी होतील़ पुढील आंदोलन हे तीव्र असेल.
- आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्या, गटनेत्या शिवसेना