राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 14:50 IST2023-12-16T14:48:20+5:302023-12-16T14:50:01+5:30
पिंपरी : शहरातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका या ठिकाणच्या ७५ हजार औद्योगिक ...

राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी : शहरातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका या ठिकाणच्या ७५ हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असून, राज्यातील इतरही महापालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा श्रीमती उमा खापरे यांनी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील मे. राणा इंजिनिअरिंग, ज्योतिबानगर येथे स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात ८ डिसेंबरला स्फोट होऊन एकूण ११ कामगार मृत्युमुखी पडले असून, यामध्ये सहा महिला कामगारांचा समावेश आहे. दहा कामगार जखमी झाले होते. या ठिकाणी व्यवसाय मालकाद्वारे नियुक्त महिला कामगार काम करीत होत्या. हा व्यवसाय अवैध असून, परवानगी घेतलेली नव्हती. ही जागा ‘रेड झोन’मध्ये समाविष्ट असून तळवडे परिसरात साधारणपणे तीन हजार विविध प्रकारच्या आस्थापना कार्यरत आहेत. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न केल्याने ही घटना घडली. दुर्घटनेच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंपनीवर कामगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन झाले आहे, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अपघात झालेल्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. धोकादायक उद्योगांवर निर्बंध टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अशा धोकादायक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येत असून कंपनीच्या आत व परिसरातील अवैध कामांवर निर्बंध घालण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.