अलंकापुरी : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 08:30 AM2023-12-09T08:30:09+5:302023-12-09T08:31:37+5:30

माऊलींच्या संजीवन समाधीची अकरा ब्रम्हवृन्दांच्या वेदघोषात महापूजा

Alankapuri: On the occasion of Kartiki Ekadashi, lakhs of devotees took darshan of Mauli in alandi | अलंकापुरी : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

अलंकापुरी : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

भानुदास पऱ्हाड

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शनिवारी (दि.९) मध्यरात्री बाराला सुरुवात झाली. संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. या विधिवत पूजेसमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते. माऊलींना नैवद्य दाखवून सनई चौघड्याच्या तालात आरती घेण्यात आली.                

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७ व्या संजीवन समाधीच्या महापूजेचा मान शेषराव सोपान आडे (वय ६०), गंगुबाई शेषराव आडे (वय ५५, रा. परतवाडी ता. परतूर जि. जालना) या वारकरी दांपत्याला मिळाला. विशेष म्हणजे २०२१ मध्ये माऊलींच्या महापूजेचा मान याच दाम्पत्यांला मिळाला होता. महापूजेचा दुसऱ्यांदा मान मिळाल्याने शेषराव आडे म्हणाले, आमच्यावर माऊलींची कृपा आहे. सात तास आम्ही दर्शनरांगेत उभे होते. आमचा व्यवसाय शेती आहे. मागील ३० वर्षांपासून सपत्निक आषाढी व कार्तिकी वारी करत आलो आहे. आई - वडिलांच्या पुण्याईमुळे आणि माऊलींची कृपा असल्याने दुग्धशर्करा योग घडून आला. सर्वांना सुखी ठेव असे मागणे माऊलींकडे मागितले आहे. देवस्थान विश्वस्तांच्या हस्ते नारळ - प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.             

महापूजेप्रसंगी विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, ह.भ.प. भावार्थ देखणे, योगी निरंजननाथजी, ॲड. राजेश उमाप, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, उपायुक्त संदीप डोईफोडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, चैतन्य महाराज लोंढे,माजी नगरसेवक डी. डी. भोसले - पाटील, सचिन गिलबिले, सागर भोसले, संजय महाराज घुंडरे, साहेबराव कुऱ्हाडे, प्रदिप बवले आदिंसह प्रशासकीय अधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.              

दरम्यान इंद्रायणीतीरी टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.   आज पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करून लाखों भाविकांनी ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे डोळेभरून दर्शन घेत आहेत. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे.

Web Title: Alankapuri: On the occasion of Kartiki Ekadashi, lakhs of devotees took darshan of Mauli in alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.