आळंदीकरांची कसरत संपणार
By Admin | Updated: October 26, 2015 01:49 IST2015-10-26T01:49:12+5:302015-10-26T01:49:12+5:30
गेल्या कित्येक वर्षांपासून करावी लागलेली ही तारेवरची कसरत आता संपणार आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आळंदीकरांची कसरत संपणार
आळंदी : गेल्या कित्येक वर्षांपासून करावी लागलेली ही तारेवरची कसरत आता संपणार आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन पूल (साधकाश्रम) ते नगरपालिका हद्दीपर्यंत तयार करण्यात येत असलेल्या डांबरी रस्त्याबाबत या परिसरातील तमाम नागरिकांसह साधक व भाविकांनी समाधान व्यक्त करीत नगरपालिकेने आमच्यासाठी जणू ही दिवाळी भेटच दिली असल्याची भावना अनेकांनी
व्यक्त केली.
आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असो, आळंदीत येणाऱ्या साधकांची गर्दी, यात्रेकरू व भाविकांची होणारी गर्दी अंघोळीसाठी इंद्रायणी पात्राच्या कडेला जमून साधकाश्रम परिसराचा उपयोग करायचे.
मात्र, या बाजूला येण्यासाठी रस्ताच नसल्याने या भागात येणाऱ्या भाविकांना नदीपात्रालगतच्या भिंतीचा आधार घेत पुढे जावे लागायचे. नवीन पुलापासून निघणारा हा रस्ता पूर्वीचा शिव रस्ता म्हणून ओळखला जातो.
इंद्रायणी काठालगत असलेल्या या भागात आषाढी व कार्तिकीनिमित्त आळंदीत येणारी भाविक मंडळी, साधक, यात्रेकरू अशी बहुतांश मंडळी याच परिसरात अंघोळीसाठी जमतात. कोणी इंद्रायणी पात्रात उतरून अंघोळ करतो, तर कोणी इंद्रायणीच्या कडेला बसून अंघोळ करतो.
मात्र, या परिसरात येण्यासाठी रस्ताच नसल्याने भाविकांना चक्क तारेवरची कसरत करावी लागायची. जीव मुठीत घेऊन चालावे लागायचे. या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या जनतेने तर भयंकर बिकट प्रसंगाचा सामना केला.
उन्हाळा, पावसाला, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये या परिसरातील जनतेने कमालीचे कष्ट सोसले असल्याचे येथील जनतेने सांगितले. येथील जनतेसह तमाम भाविकांची बाराही महिने होत असलेली अडचण विचारात घेऊन नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी या रस्त्याबाबत पाठपुरावा करीत निधी आणला. येथील कामे सुरू झाल्याने
स्थानिक नागरिकांबरोबर भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)