आळंदीकरांचा स्वच्छतेचा संदेश
By Admin | Updated: July 8, 2015 01:26 IST2015-07-08T01:26:29+5:302015-07-08T01:26:29+5:30
नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला.

आळंदीकरांचा स्वच्छतेचा संदेश
आळंदी : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला.
कीर्तनकाराचा वेष परिधान केलेले मुख्याधिकारी औंधकर, खादीचे धोतर, सदरा, त्यावर काळे जॅकेट आणि डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी पांढरी टोपी घालून स्वच्छतादूताच्या वेषातील नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्यासह टाळमृदंगाचा गजर करत डोक्यावर स्वच्छता संदेश देणाऱ्या टोप्या व हातात फलक घेऊन निघालेल्या चिमुकल्यांनी आळंदीलाच नव्हे, तर महाराष्ट्रालाच जणू स्वच्छतेचा संदेश दिला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत आळंदी येथे स्वच्छतेचा संकल्प स्वच्छता दिंडीतून करण्यात आला.
सकाळी १० वाजता नगर परिषदेपासून शुभारंभ करण्यात आलेल्या या दिंडीत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी डोक्यावर फेटा व अंगातील सदऱ्यावरून साक्षात ख्यातनाम कीर्तनकाराचा वेष परिधान केलेला, तर नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी टोपी, पांढरा खादीचा सदरा, धोतर व त्यावर काळे जॅकेट, तर शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय गणवेशात डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पांढऱ्या शुभ्र टोप्या, हातात स्वच्छतेचा जागर करणारे घोषवाक्ये लिहिलेले फलक, शिक्षिका, शिक्षक, प्राध्यापक, विविध दिंडीतील दिंडीकरी, आळंदीत दाखल झालेले वारकरी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक नागरिकांनी मोठा सहभाग होऊन हा उपक्रम यशस्वी केला.
नगर परिषदेपासून सुरू झालेली ही स्वच्छता दिंडी नवीन एस.टी. स्टॅण्ड, चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, नगर परिषद चौक ते महाद्वार चौक अशा मार्गाने परिक्रमा करून इंद्रायणीच्या घाटावर पोहोचला.