आळंदीतील प्रशस्त रस्ते बनताहेत ‘वाहनतळ’
By Admin | Updated: July 3, 2017 02:14 IST2017-07-03T02:14:18+5:302017-07-03T02:14:18+5:30
अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत लाखो रुपये खर्च करून नव्याने तयार केलेले सिमेंटचे प्रशस्त रस्ते वाहतुकीऐवजी ‘पार्किंग’च्या

आळंदीतील प्रशस्त रस्ते बनताहेत ‘वाहनतळ’
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत लाखो रुपये खर्च करून नव्याने तयार केलेले सिमेंटचे प्रशस्त रस्ते वाहतुकीऐवजी ‘पार्किंग’च्या कामी येत आहेत. परिणामी हे रस्ते नागरिकांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरू लागले आहेत. शहरातील रस्त्यालगत असलेल्या बहुतांशी विवाह कार्यालयांना तसेच धर्मशाळांना स्वत:चे वाहनतळ नाही. त्यामुळे लग्न समारंभासाठी शहरात आलेली शेकडो वाहने तासन्तास बेकायदेशीरपणे रस्त्यांवर उभी केली जात असल्याने रस्त्यांचा श्वास कोंडला जाऊन वाहतूक कोंडी होत आहे. या वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.
शहरातील वडगाव रस्ता, चाकण रस्ता, मरकळ रस्ता, प्रदक्षिणा मार्ग तसेच माऊली मंदिर परिसराला वाहनस्थळाचे रूप प्राप्त होऊ लागले आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आळंदी शहराला जोडणाऱ्या चाकण, वडगाव, मरकळ आदी रस्त्यांच्या मजबुतीकरणाची कामे नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील वाहनांची संख्या व वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन पूर्वीपेक्षा रस्त्यांचे रुंदीकरण वाढवून प्रशस्त रस्ते तयार केले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
रस्ते रुंदीकरणानंतर शहरात बिकट बनत चाललेला वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल असे वाटत होते. मात्र प्रशस्त रस्ते बनवूनही वाहतूककोंडीची समस्या काही केल्या आळंदीची पाठ सोडत नसल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. या समस्येत नागरिक, वाहतूकदार तसेच वऱ्हाडी मंडळी अधिक भर घालण्याचे काम करत आहेत.
शहरातील सर्वच रस्ते ‘नो पार्किंग’ झोनमध्ये असतानाही वाहनचालक तसेच वऱ्हाडी मंडळी याच रस्त्यांचा वापर वाहने पार्किंगसाठी करत आहेत. परिणामी शहरातील वाहतुकीला पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत.
वडगाव चौक ते चऱ्होली हद्दीपर्यंत असणाऱ्या विवाह कार्यालयांसमोर मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहन पार्किंग केली जात आहे. शनिवारी आणि रविवारी तर अक्षरश: संपूर्ण रस्ता ‘पार्किंगमय’ झाल्याने रस्त्यावरून इतर वाहनांना वाहतूक करणेही अवघड बनले होते.
प्रदक्षिणा मार्गावरून मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर महाद्वारात प्रवेशाच्या वेळी भाविकांना येथील बेशिस्त पार्किंगचा सामना करावा लागत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच दुकानदार, प्रसाद विक्रेते, पथारीवाले, फेरीवाले आदींचे अतिक्रमण अधिक भर घालत आहे. त्यामुळे शेजारील रस्त्यावरून पायी ये जा करतानाही अडचण होत आहे.
बेकादेशीरपणे ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये वाहने लावलेल्या महाशयांवर पोलिसांनी नित्याने कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व भाविकांकडून केली जात आहे.
प्रदक्षिणामार्गही
बनतोय वाहनतळ...
अलंकापुरी शहरात चौफेर असंख्य धर्मशाळा, विवाह मंगल कार्यालये, विविध संस्था आहेत. मात्र धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांकडे स्वत:च्या मालकीची वाहन पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध नाही. त्यामुळे लग्नसमारंभाला दाखल झालेल्या बहुतांशी सर्व गाड्या वर्दळीच्या रस्त्यांवर उभ्या केल्या जात आहेत.