अजित पवारांचे राजकीय कसब पणाला

By Admin | Updated: March 18, 2015 22:59 IST2015-03-18T22:59:47+5:302015-03-18T22:59:47+5:30

नीरा खोऱ्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांनी वातावरण ढवळून निघाले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात आहेत.

Ajit Pawar's political career | अजित पवारांचे राजकीय कसब पणाला

अजित पवारांचे राजकीय कसब पणाला

बारामती : नीरा खोऱ्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांनी वातावरण ढवळून निघाले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये मुख्य लढत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल आणि शेतकरी कृती समिती पुरस्कृत सहकार बचाव पॅनलमध्ये होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढवाण यांनी ९ उमेदवारांचे पॅनल आज अचानक जाहीर केले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत काकडे विरुद्ध पवार गटामध्ये चुरशीची लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सोमेश्वर कारखाना १९९२ साली काकडे गटाकडून ताब्यात घेताना अजित पवार यांनी काकडे यांच्यातच सत्तासंघर्ष लावून दिला. प्रमोद काकडे, सतीश काकडे, शहाजी काकडे यांना वेगवेगळ्या वेळी बरोबर घेऊन कारखान्याची सत्ता हस्तगत केली. सोमेश्वर कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. प्रतापगड कारखाना सोमेश्वरने चालविण्यास घेतला. तेव्हापासून विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्प, शैक्षणिक संस्था सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केलेल्या कारखान्याला आर्थिक घरघर लागली.
ऊस दर देताना देखील अडचणी आल्या. गैर व्यवहार प्रकरणे पुढे आली. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांनी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीला पहिला धक्का बसला. निवडणुकीच्या सुरुवातीलाच काकडे-पवार यांच्यातील वाक्युद्ध रंगू लागले आहे. शहाजी काकडे यांनी थेट कोणाच्या बाजुने जाण्याचा निर्णय घेतला नसला तरी अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
सोमेश्वरच्या अगोदर माळेगाव कारखान्याची निवडणूक होणार आहे. माळेगाववर वर्चस्व गाजविलेली चंदरराव तावरे, रंजन तावरे ही जोडगोळी पुन्हा एकत्र आली आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घरनिहाय ऊस उत्पादकांची
माहिती असलेल्या तावरे यांचे
आव्हान पेलण्यासाठी अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. उमेदवारी देताना जातीय समीकरणावर भर दिला. त्याचबरोबर तावरे यांच्या बाजुने झुकलेल्या मंडळींच्या घरातीलच काही लोकांना उमेदवारी दिली.
त्यामुळे कौटुंबिक कलह काही ठिकाणी निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आंदोलने बारामती सलग दोन वर्ष झाली. सत्तास्थानावरच घाव घालण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही उमेदवार रिंगणात राहिले. त्यांना बरोबर घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ९ उमेदवारांचा पॅनल जाहीर केला.
सहकार बचाव पॅनलच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला. आम्ही सुचविलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या ९ जणांना घेऊन स्वतंत्र निवडणूक लढविली जात असल्याचे ढवाण यांनी सांगितले. स्वाभिमानीच्या या ९ उमेदवारांचा त्रास कोणाला होणार, याची चर्चा सुरू आहे.
या सर्व घडामोडींमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री पदावर नसताना अजित पवार यांना विरोधकांबरोबरच पक्षातील मंडळींनी आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय कसब या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

४विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली आहे. मात्र, अजित पवार यांना त्यांच्या ताब्यातील कारखाने बिनविरोध करणे शक्य झाले नाही.
४किंबहुना अगदी बारामती सहकारी बँकेची निवडणूक देखील बिनविरोध झाली नाही़ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या बरोबर मागील १५ वर्षांपासून विविध पदांवर काम केलेल्या मंडळींनी नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करून बंडाचा झेंडा उगारला. त्यामुळे सत्तांतरानंतर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या अजित पवार यांच्यावर ‘ताक’ सुद्धा फुंकुन पिण्याची वेळ आली आहे.

Web Title: Ajit Pawar's political career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.