पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार, खासदार सामील आहेत, अशी घाणाघाती टीका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत केली.
हाके म्हणाले, महाराष्ट्रात सध्या झुंडशाही जोमात असून, लोकशाही कोमात गेला आहे. त्यात झुंडशाहीच्या जोरावर राज्यातील ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा घाट जरांगे नावाच्या काडीपेटीचा ज्वालामुखी केला आहे. हा आरक्षणाचा लढा नाहीये. जरांगेंनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली. मी सरकार उलथून लावणार आहे, असे म्हणाले. तसेच नांदेडचा खासदार चव्हाण याने जरांगेंना लेखी पाठिंबा दिला आहे. हे काम सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी केले आहेत. जरांगे नावाच्या काडीपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? जरांगे हुकूमशाहा आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत. लक्ष्मण हाके वर गुन्हा, जरांगेला रेड कार्पेट का? असा आरोप देखील हाके यांनी केला आहे.
आम्ही देखील आंदोलन करणार
आम्ही गावगाड्यात ५० टक्के आहोत. सगळे एकत्र झाले तर तुमचे काय होईल. तुम्ही ओबीसींचे आरक्षण संपवायला चालला आहात. ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. ओबीसी मंत्र्यांना ओबीसी समाज माफ करणार नाही. मी आमदार, खासदाराचा पोरगा नाही, मी चुकलो असेल तर मला आतमध्ये टाका. आता जातीजातीत भांडायची वेळ नाही. मी आत्महत्या करू का? म्हणजे प्रश्न सुटतील. ओबीसी एकत्र येत आहोत. आम्हीदेखील आंदोलन करणार आहोत.
मुंबईसुद्धा पेटू शकते
बीड ज्या पद्धतीने पेटलं, ती परिस्थिती मुंबईमध्ये होऊ शकते. गृह विभागाकडून सामाजिक दुजाभाव सुरू आहे. जरांगेंना सपोर्ट करणारे कारखानदार आणि वतनदार आमदार, खासदार आहेत. जरांगे नावाच्या काडीला ज्वालामुखीत रूपांतर करण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार जबाबदार आहेत. छगन भुजबळ याबाबत बोलतील हा आमचा विश्वास आहे. उद्या आमची मीटिंग होत आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरवू. जिवात जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत. वेळ पडली तर आम्ही मुंबईलादेखील जाऊ. प्रकाश सोळंके, विजय पंडित, बजरंग सोनवणे यांनी पहिल्यांदा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. मग जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे.