नगरच्या कुरिअर कंपनीत स्फाेट झालेले पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:43 IST2018-03-21T13:43:01+5:302018-03-21T13:43:01+5:30
अहमदनगर येथील एका कुरिअर कंपनीमध्ये स्फाेट झालेले पार्सल पुण्यातील काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरहद या संस्थचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने असल्याचे समाेर अाले अाहे.

नगरच्या कुरिअर कंपनीत स्फाेट झालेले पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने
पुणे : अहमदनगर येथील एका कुरिअर आॅफिसमध्ये स्फोट झालेले पार्सल पुण्यातील सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. हे पार्सल कोणी पाठवले, त्यामागील हेतू काय याबाबतच्या चर्चांना उधाण आले असून, अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये काम करत असल्याने धमकीचे फोन अथवा संदेश येत असतात. मात्र एवढा मोठा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे संजय नहार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
अहमदनगरमधील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कंपनीमध्ये संजय नहार यांच्या नावाने एक पार्सल आले होते. या पार्सलच्या स्फोटाने कंपनीतील दोन कर्मचारी जखमी झाले. पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीच्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत लोकमतशी बोलताना नहार म्हणाले, सरहद संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी काम सुरु आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरमधील काम थांबवा, अश्या आशयाच्या धमक्या फोन आणि संदेशाच्या माध्यमातून येत होत्या. मात्र पार्सल येण्याची घटना पहिल्यांदाच घडली असून याबाबत पोलीस वेगाने तपास करत आहेत. पोलीसांनी सुरक्षा घेण्याचे आवाहन केले आहे. एका कामानिमित्त गुरुवारी पंजाबचा दौरा सुनियोजित होता. मात्र या घटनेमुळे काही दिवस शहराच्या बाहेर पडू नये असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. स्फोटामुळे माझ्यावरील संकट टळले असले तरी कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यांबद्दल दु:ख वाटत आहे.