चोरट्यांकडून वृद्धांना बेदम मारहाण
By Admin | Updated: February 3, 2017 03:59 IST2017-02-03T03:59:49+5:302017-02-03T03:59:49+5:30
भांबुरवाडी-वाळुंजस्थळ (ता. खेड) येथे चोरट्यांनी वृद्धांना बेदम मारहाण करून घरातील ७० हजार रुपांयाची रोकड व अंगावरील दागिने असा ऐवज लांबविला. पहाटेच्या

चोरट्यांकडून वृद्धांना बेदम मारहाण
दावडी : भांबुरवाडी-वाळुंजस्थळ (ता. खेड) येथे चोरट्यांनी वृद्धांना बेदम मारहाण करून घरातील ७० हजार रुपांयाची रोकड व अंगावरील दागिने असा ऐवज लांबविला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, रात्रीत तीन ठिकाणी या परिसरात चोरी झाली. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. येथील बाळासाहेब बाबूराव वाळुंज (वय ७५) व त्यांच्या पत्नी बारकाबाई बाळासाहेब वाळुंज (वय ७०) यांच्या घराचा दरवाजा पहाटे ३ वाजता तीन ते चार चोरट्यांनी उघडून दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. बाळासाहेब यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बारकाबाई यांच्या कानाला चावा घेऊन कानातील सोन्याच्या कुड्या, गळ्यातील मंगळसूत्र असे चार तोळ्यांचे दागिने व कुलूप तोडून कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये चोरट्यांनी लांबविले.
चोरट्यांनी अंगात टी शर्ट व बरमुडा घातला होता. तसेच त्याच रात्री रोडेवस्ती येथील संतोष रोडे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी मारहाण करुन घरातील अडीच हजार रुपये घेऊन पलायन केले. तुकाईवाडी येथील शरद कोरडे घरात चोरट्यांनी प्रवेश करुन मारायची भीती दाखवून तीन ग्रॅम सोन्याचा दागिना लांबविला.
याबाबत येथील ग्रामस्थ भाऊसाहेब ढोरे, प्रकाश वाळुंज, शरद वाळुंज, महेंद्र वाळुंज यांनी या घटनेची माहिती सकाळी ५.३० वाजता दिली. खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, उपनिरीक्षक चेतन माने, डी. एस. महाडिक यांनी घटनास्थळी येऊन जखमींची विचारपूस करून तीनही ठिकाणी पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला. पुणे येथून श्वानपथक व फिंगरप्रिंट पथक दुपारी घटनास्थळी आले. श्वानाने चोरट्यांचा पळून जाण्याचा शेतामधील बांधापर्यंत मार्ग दाखवला. फिंगरप्रिंट विभागातील कर्मचारी यांनी रक्ताचे नमुने व घडलेल्या जागेची पाहणी केली.