साडेपाच लाखांची लाच घेताना एजंटाला अटक
By Admin | Updated: March 25, 2015 00:22 IST2015-03-25T00:22:31+5:302015-03-25T00:22:31+5:30
अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या करमणूक कर अधिकाऱ्यांशी तडजोड करून कमी करून देतो असे सांगून साडे पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या एका एजंटाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

साडेपाच लाखांची लाच घेताना एजंटाला अटक
पुणे : अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या करमणूक कर अधिकाऱ्यांशी तडजोड करून कमी करून देतो असे सांगून साडे पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या एका एजंटाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगळवारी दुपारी एक वाजता डेक्कन जिमखाना येथे ही कारवाई करण्यात आली.
दीपक शंकर शिवले (वय ४२) असे त्या एजंटाचे नाव आहे. तो हाथवे केबल अॅन्ड डेटा कॉमचा असीस्टंट वाईस प्रेसिडेंन्ट म्हणून कार्यरत आहे. तक्रारदारांचा केबलचा व्यवसाय आहे. त्यांचा केबल कराची पूर्वीची थकबाकी कमी करून देतो असे सांगून दीपक शिवले याने त्यांच्याशी संपर्क साधला. करमणूक अधिकाऱ्यांशी तडजोड करून देण्याचे आमिष त्याने दाखविले. तक्रारदारांनी याविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगळवारी डेक्कन जिमखाना येथील स्टरलिंग प्लाझा येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी साडे पाच लाखांची रक्कम स्वीकारताना शिवले याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
शासकीय अधिकाऱ्याचा सहभाग नसलेली कारवाई
४लाच स्वीकारण्याची कारवाई शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रामुख्याने करण्यात येते, त्याचबरोबर त्यांच्यावतीने पैसे स्वीकारणाऱ्या एजंटलाही अटक केली जाते. याप्रकरणातील लाचेची रक्कम ही लाखोंच्या घरात होती. मात्र यामध्ये एकाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग नाही. केवळ खाजगी एजंटच इतकी मोठी रक्कम घेत असताना आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.