खरिपानंतर आता रब्बी हंगामाचीही चिंता

By Admin | Updated: September 27, 2015 01:26 IST2015-09-27T01:26:59+5:302015-09-27T01:26:59+5:30

खरिपाच्या हंगामातील उत्पन्नात तीस ते पन्नास टक्के घट येण्याची भीती असताना रब्बीचा पाऊसही पुणे जिल्ह्यात सलग नाही.

After the sermon now the rabbi season is also concerned | खरिपानंतर आता रब्बी हंगामाचीही चिंता

खरिपानंतर आता रब्बी हंगामाचीही चिंता

पुणे : खरिपाच्या हंगामातील उत्पन्नात तीस ते पन्नास टक्के घट येण्याची भीती असताना रब्बीचा पाऊसही पुणे जिल्ह्यात सलग नाही. त्यामुळे शेतकरी पेरण्यांबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे रब्बीचा हंगाम तरी समाधानकारक असेल किंवा कसे याबाबतच्या चिंतेने बळीराजाला घेरले आहे. हंगाम सरत आला तरीही जोरदार पावसाची शेतकऱ्यांची आशा अजूनही संपलेली नाही.
जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात खरिपात झालेली बाजरी आणि मुगाची शंभर टक्के पेरणी वाया गेली आहे. भात, भुईमूग, बाजरी, मूग, ज्वारी या प्रमुख खरीप पिकांच्या उत्पन्नात निम्म्याहून अधिक घट येण्याची भीती आहे. ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा आहेत, अशाही ठिकाणी तीस टक्के घट येऊ शकेल, असे जाणकारांचे मत आहे.
मौसमी पाऊस जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांत समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. सध्या बाजरी काढण्याची वेळ असून, शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्यांमधील शेतकरी खरिपाची पिके मोडून, पिके काढून रब्बीची पेरणी करण्याच्या मन:स्थितीत आहेत. रब्बीची पिके घेणाऱ्या पुरंदरमध्ये पाऊस समाधानकारक झालेला नसल्याने चिंता संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावांमध्ये पश्चिम पट्ट्यातील भाताच्या पिकांना आधार मिळाला. फुलोऱ्याच्या स्थितीत असलेल्या भाताच्या पिकाला पाण्याची खूप गरज असते. मात्र भात, भुईमुगाच्या याच फुले येण्याच्या स्थितीत पाऊस पूर्णपणे गायब झाला असून, खाचरांमधील पाणी आटले आहे. तापमानात वाढ झाली आहे. पश्चिम पट्ट्यातही त्यामुळे भात उत्पादनात तीस टक्के घट येण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश धुमाळ यांनी या माहितीला दुजोरा देत सांगितले, की खरिपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने जेथे उगवण किंवा वाढ समाधानकारक नाही, अशा भागातील शेतकरी पिके मोडून, पिके काढून रब्बीची पेरणी करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा वाढण्याची शक्यता आहे.
उभ्या ऊसपिकाला पावसाचा फायदा झालेला नाही. त्यामुळे उसाच्या उत्पादनातही घट येऊ शकेल. एकूणच खरीप भाताच्या वाढीसाठी, रब्बीच्या पेरण्यांची टक्केवारी वाढण्यासाठी काही तालुक्यांमध्ये जोमाच्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
जुन्नर, खेड, आंबेगाव, पश्चिम हवेलीसह राष्ट्रीय महामार्गालगतच्या तालुक्यांमध्ये झालेली भाताची पेरणी व पिके तग धरून आहेत. वेळेवर पाऊस झाला असता तर भाताची पिके दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत वाढली असती. पावसाने दीर्घ दडी मारल्यानंतर भाताला फुटवे उशिरा आले. पेरणीनंतर दीड महिन्यात भाताचे पीक
हाती येते. या वर्षी पावसाने काही तालुक्यांत दडी मारली तर काही तालुक्यांत तो उशिराने सुरू झाला.

Web Title: After the sermon now the rabbi season is also concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.