प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:05 AM2017-10-28T01:05:48+5:302017-10-28T01:05:58+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर संपूर्ण गाव बंद ठेवून आज होणा-या तहसीलदार यांच्या बैठकीस जनमानसात आक्रोश किती पसरला आहे, हे दाखवून दिले.

After the resignation of the people against pollution in Kurkumbh, | प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

Next

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर संपूर्ण गाव बंद ठेवून आज होणा-या तहसीलदार यांच्या बैठकीस जनमानसात आक्रोश किती पसरला आहे, हे दाखवून दिले. प्रदूषणाच्या विषयावर बोलावलेल्या या बैठकीस खुद्द तहसीलदारच गैरहजर राहिले, तसेच प्रदूषण मंडळाच्या अधिका-यांनीदेखील तहसीलदारांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. पुढील बैठकीस कुठलेही कारण पुढे न करण्याची मागणी करीत निवेदन दिले.
कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी रासायनिक प्रकल्पाच्या मुजोरीपणाला कंटाळून शेवटी जनआक्रोश व्यक्त करीत कुरकुंभ येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जाब विचारला. त्यामुळे गोंधळ उडालेल्या या केंद्राने प्रक्रिया बंद ठेवून ग्रामस्थांच्या विरोधाला उत्तर देण्याऐवजी अन्य मार्गाद्वारे ग्रामस्थांना घाबरून सोडण्याचे काम केले. परिणामी या सर्व प्रकारावर दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दखल घेत बैठक आयोजिण्याचे व निष्कर्ष काढण्याचे संकेत दिले. त्याप्रमाणे त्यांनी लेखी पत्राद्वारे ग्रामस्थांना व प्रदूषणासंबंधी सर्व अधिकाºयांची बैठक आयोजिली, मात्र ऐन वेळेस बैठकीला बगल देत ग्रामस्थांच्या संतापाला फुंकर मारली आहे.
कुरकुंभ येथे वर्षानुुवर्र्षे चालत आलेल्या प्रदूषणाच्या विषयाला नुकतीच चालना मिळाली असून या ठिकाणचा तरुणवर्ग पेटून उठला आहे. मुजोर कंपनीच्या मालकांनी पैशाच्या जोरावर आतापर्यंत या विषयावर शासकीय अधिकारी, प्रदूषण मंडळ इत्यादींना हाताशी धरून राजरोसपणे सांडपाणी उघड्यावर सोडून कुरकुंभ, पांढरेवाडी व परिसरातील पर्यावरण, हजारो एकर जमीन व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तरुणवर्गाने या प्रश्नावर प्रशासनासहित प्रदूषण मंडळ व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला धारेवर धरले असून याबाबत दूरगामी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील मोठमोठे प्रकल्पदेखील सामूहिक सांडपाणी केंद्रात रासायनिक सांडपाणी सोडत आहेत. त्यामुळे या मोठ्या उद्योगांना स्वत:ची प्रक्रिया केंद्रे उभारणे गरजेचे आहे. जेणेकरून या सामूहिक केंद्रातील प्रक्रिया होणारे रासायनिक पाण्यावर नियंत्रण ठेवता येईल. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात फक्तलहान उद्योगांना पाणी सोडण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता वाढेल. या उद्योगसमूहातील काही उद्योग झीरो डिस्चार्ज (शून्य सांडपाणी सोडण्याचा उद्योग) चालवत आहेत. त्यामुळे त्या उद्योगांनीदेखील सांडपाणी कुठेही गैररीत्या सोडू नये, एवढीच अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांचा या औद्योगिक क्षेत्रातील कुठल्याच उद्योगांना विरोध नसून बेकायदेशीरपणे सांडपाणी उघड्यावर सोडणा-या कंपनी व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला असल्याचे दिसत आहे.
प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष
कुरकुंभ ग्रामस्थांच्या प्रदूषणविरोधात जनआक्रोशाला जवळपास महिना उलटत आला तरीदेखील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा एकही अधिकारी कुरकुंभ येथे फिरकला नाही. आज तहसीलदारांनी बोलावलेल्या बैठकीलादेखील त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रदूषण मंडळाचा दुर्लक्षपणा स्पष्टपणे उघडकीस आला आहे.
शासनाने नियुक्त केलेल्या या अधिका-यांना त्वरित बरखास्त करण्याची मागणीदेखील ग्रामस्थ करीत आहेत. प्रदूषण मंडळाचे अधिकारी हे परस्पर कंपनीमालकांशी आर्थिक संबंध ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
उत्स्फूर्त गाव बंद
दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजिलेल्या बैठकीला समर्थन देण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी व
कुरकुंभ येथील प्रत्येक व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवले. मात्र जनमताचा विचार न करता तहसीलदारांनी बैठकीला दांडी मारत निराशा पसरवली. याचाच परिणाम ग्रामस्थ जास्त आक्रमक झाले असून पुढील बैठक फक्त कुरकुंभलाच होणार, त्याशिवाय कोणीच बैठकीला येणार नाही, याचा चंग बांधला आहे. या सर्व घटनेत ग्रामस्थांनी स्वंयस्फूर्तीने गाव बंद ठेवून युवकांना पाठिंबा दिला आहे.

Web Title: After the resignation of the people against pollution in Kurkumbh,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.