स्वातंत्र्यानंतरही पाण्यासाठी गावे तहानलेलीच...
By Admin | Updated: May 4, 2016 04:34 IST2016-05-04T04:34:48+5:302016-05-04T04:34:48+5:30
स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षे उलटली खरी; परंतु अजूनही पुणे जिल्ह्यातील कित्येक गावे पाण्यासाठी तहानलेलीच आहेत. शिरवली हि.मा गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठा

स्वातंत्र्यानंतरही पाण्यासाठी गावे तहानलेलीच...
भोर : स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षे उलटली खरी; परंतु अजूनही पुणे जिल्ह्यातील कित्येक गावे पाण्यासाठी तहानलेलीच आहेत. शिरवली हि.मा गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठा योजना नसून गावात कुठेच पाणी उपलब्ध नाही. गावातील एका हातपंपावर नंबर लावून पाणी भरले जाते. दिवसभर पाणी हापसल्यावर तासाला जेमतेम चार हांडे मिळतात. बाकी सारी भिस्त टँकरच्या पाण्यावर. मात्र, अद्याप टँकरदेखील सुरू झालाच नाही केवळ हातपंपावरच अवलंबून राहावे लागते.
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून टँकरग्रस्त गावाचा आढावा घेतला त्या वेळी हे चित्र समोर आले असून महिलांनी आपली व्यथा मांडली. भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा-देवघर धरण भागात दर वर्षी पावसाळ्यात तीन ते सोडतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, पाणी डोंगरावरून वाहून जाते. धरणाच्या काठावरील शिरवली हि.मा गावात १५ वर्षांपासून उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठ्याची योजना राबवली गेली नाही. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटूनही धरणाच्या कुशीत असणारे हे गाव पाण्यापासून मात्र वंचित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रणजित शिवतरे यांनी पाणी साठवण्यास टाक्या आणि खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. तो टँकर अधूनमधून येत असल्याने थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे येथील गृहिणी मंदा शिरवले यांनी सांगितले. गावाजवळचे ढवरे आटले असून जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने तीन किलोमीटरवर असलेल्या नीरा-देवघर धरणातून डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करीत किंवा पिकअप जीपने विकत पाणी आणावे लागते. महिलांचे पाण्यावाचून मोठे हाल सुरू आहेत. रिंगरोडला लागून असलेल्या हातपंपाला दिवसभर रांगा लागतात.
धरण भागातील रिंगरोडवरील गावांची लोकसख्या कमी असल्याने पाणीपुरवठा योजना मंजूर होत नाहीत; मात्र पऱ्हर बुद्रुक, पऱ्हर खुर्द, निवंगण, शिरवली हि.मा, माझेरी कुडली बुद्रुक व खुर्द या गावांची निकष बाजूला ठेवून खास बाब म्हणून एकत्रित प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे प्रयत्न करीत आहेत. ते शक्य झाल्यास लोकांची पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होऊ शकेल.