उत्सवानंतर शहरात साथीच्या आजारांत वाढ
By Admin | Updated: September 30, 2015 01:36 IST2015-09-30T01:36:46+5:302015-09-30T01:36:46+5:30
शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी होणाऱ्या लक्षणीय गर्दीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे चित्र आहे. गर्दीमुळे शहरात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत

उत्सवानंतर शहरात साथीच्या आजारांत वाढ
पुणे : शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी होणाऱ्या लक्षणीय गर्दीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे चित्र आहे. गर्दीमुळे शहरात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे.
उत्सवादरम्यान वापरल्या जाणाऱ्या गुलालामुळेही अनेकांना श्वसनाचे विकार होतात. श्वसनाद्वारे गुलाल नाका-तोंडावाटे श्वसननलिकेत गेल्यामुळे अॅलर्जीच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. त्यामुळे घशाचा संसर्ग, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टर दिलीप देवधर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या कालावधीत बाहेरगावाहून अनेक जण पुण्यासारख्या ठिकाणी गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येतात. अशा प्रकारे बाहेर ठिकाणहून आलेले नागरिक आपण राहत असलेल्या ठिकाणी असणारे संसर्ग घेऊन येतात. त्यामुळे शहरातील एकूणच संसर्गात वाढ झाली आहे, असे डॉ. देवधर यांनी सांगितले.
उत्सवानंतर कानाच्या तक्रारींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांंपासून ते वयस्क व्यक्तींपर्यंत अनेक जण कानाच्या विविध तक्रारी घेऊन कान-नाक-घसातज्ज्ञांकडे गर्दी करीत आहेत. यामध्ये कानात गुलाल जाणे, ढोल, बँड अथवा स्पिकरच्या भिंतींमुळे कानात एकसारखा आवाज येणे, कानात कळ येणे अशा तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येत असल्याचे कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. स्वानंद घोलप यांनी सांगितले.
लहान मुलांना मोठ्या उत्साहात ढोल ऐकवण्यासाठी नेले जाते, मात्र त्यांच्या कानाचे पडदे नाजूक असल्याने त्यावर आघात होऊन त्यांच्या पडद्यांना त्रास होऊ शकतो. याबरोबरच यादरम्यान घशाच्या संसर्गांमध्येही वाढ होत असल्याने त्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे.
या सर्व तक्रारींमध्ये महिला व पुरुष यांच्यातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील नागरीकांचे प्रमाण जास्त आहे. एरवी कान, नाक आणि घसा यांच्या तक्रारींसाठी आठवड्याला २० ते २५ रुग्ण येतात, तर आता त्यात दुपटीने वाढ झाली आहे. येत्या ८ ते १५ दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)