न्यायालयाच्या परवानगीनंतर ED च्या उपस्थितीत डीएसकेंना कार्यालयात प्रवेश, पंचनामा करून चित्रीकरण

By नम्रता फडणीस | Published: April 19, 2024 08:05 PM2024-04-19T20:05:44+5:302024-04-19T20:06:26+5:30

न्यायालयाच्या आदेशाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चित्रीकरण केले...

After court permission DSKs enter office in presence of ED, take panchnama and film | न्यायालयाच्या परवानगीनंतर ED च्या उपस्थितीत डीएसकेंना कार्यालयात प्रवेश, पंचनामा करून चित्रीकरण

न्यायालयाच्या परवानगीनंतर ED च्या उपस्थितीत डीएसकेंना कार्यालयात प्रवेश, पंचनामा करून चित्रीकरण

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगला आणि कार्यालयात एकदाच प्रवेश करण्याची परवानगी मुंबईतील विशेष न्यायालयाने दिल्यानंतर शुक्रवारी जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालय, तसेच सेनापती बापट रस्त्यावरील बंगल्यात बांधकाम व्यावसायिक दीपक दत्तात्रय कुलकर्णी (डीएसके) यांना प्रवेश देण्यात आला. कुलकर्णी यांनी खटल्याच्या कामकाजासाठी काही कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक उपकरणे ताब्यात घेतली. न्यायालयाच्या आदेशाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चित्रीकरण केले. त्यानंतर कुलकर्णी यांचा बंगला आणि कार्यालय पुन्हा सील करण्यात आले.

कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सेनापती बापट रस्त्यावरील सप्तशृंगी बंगला, तसेच जंगली महाराज रस्त्यावरील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे कार्यालय जप्त करण्यात आले आहे. बंगला आणि कार्यालयात कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक उपकरणे आहेत. खटल्याच्या कामकाजात माझी बाजू मांडण्यासाठी कागदपत्रे आणि उपकरणांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे बंगला आणि कार्यालयात प्रवेश करण्यास तात्पुरती परवानगी मिळावी, असा अर्ज कुलकर्णी यांनी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात सादर केला होता. त्यानुसार ईडीने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कुलकर्णी यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. कुलकर्णी आणि कुटुंबीयांना प्रवेश देण्यात यावा. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यात आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत. या प्रक्रियेचा पंचनामा करून नोंद करावी. ईडी आणि कुलकर्णी यांनी आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा. ईडीचे अधिकारी आणि कुलकर्णी कुटुंबीय बंगला आणि कार्यालयात प्रवेश करताना, तसेच कागदपत्रे घेताना त्याचे चित्रीकरण करण्यात यावे. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले होते.

कुलकर्णी यांच्यासह ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी सकाळी जंगली महाराज रस्त्यावरील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. डीएसके यांच्या कार्यालय आणि बंगल्यावर ईडीने छापा टाकला अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. मात्र, न्यायालयाच्या परवानगीने ईडीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डीएसके यांना कार्यालय आणि बंगल्यात प्रवेश देण्यात आला.

Web Title: After court permission DSKs enter office in presence of ED, take panchnama and film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.