अखेर धोम-बलकवडीचे पाणी मिळाले
By Admin | Updated: April 1, 2017 00:09 IST2017-04-01T00:09:05+5:302017-04-01T00:09:05+5:30
एक महिन्यापूर्वी बंद झालेल्या धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याचे तिसरे आवर्तन गुरुवारी

अखेर धोम-बलकवडीचे पाणी मिळाले
नेरे : एक महिन्यापूर्वी बंद झालेल्या धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याचे तिसरे आवर्तन गुरुवारी (३0 मार्च) रात्री सोडण्यात आले. यामुळे वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सध्यातरी समस्या मिटणार आहे़
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता़ विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊन तळ घाटला होता. परिसरातील पाणीटंचाईमुळे दुग्ध व्यवसाय व अर्थकारण कोलमडले होते़
‘लोकमत’ने नेरे, आंबवडे परिसरात पाहणी करून ‘धोम-बलकवडी कालवा आवर्तनाच्या प्रतीक्षेत’ अशी बातमी २७ मार्च रोजी प्रसिद्ध केली होती़ याचा प्रभाव होऊन पाठपुराव्याने गुरुवारी धरणातून उजव्या कालव्याचे एक महिन्यापूर्वी बंद केलेले आवर्तन चालू करण्यात आले़ या पाण्यामुळे उन्हाळी पिकांना जीवदान मिळाले आहे़ पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्यातरी दूर होणार आहे़ कालव्याचे आवर्तन सुटल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असून, शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे़ (वार्ताहर)