फायदा आयआरबीला; मनस्ताप प्रवाशांना

By Admin | Updated: August 9, 2015 03:56 IST2015-08-09T03:56:46+5:302015-08-09T03:56:46+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाट ते खोपोली घाटदरम्यान सातत्याने दरडी पडत असल्याने मागील दीड महिन्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे़

Advantage to IRB; Displeasure passengers | फायदा आयआरबीला; मनस्ताप प्रवाशांना

फायदा आयआरबीला; मनस्ताप प्रवाशांना

- विशाल विकारी,  लोणावळा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाट ते खोपोली घाटदरम्यान सातत्याने दरडी पडत असल्याने मागील दीड महिन्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे़ असे असले, तरी त्याचे सोयरसुतक नसल्याने या मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणारी आयआरबी कंपनी राजरोसपणे वाहनचालकांकडून टोलवसुली करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे़
खरं तर डोंगरभागातील दगड पडणे हे नैसर्गिक आहे. असे असले, तरी संभाव्य धोके टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणांची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करून उपाययोजना करणे संबंधित यंत्रणांसाठी क्रमप्राप्त आहे़ मात्र, त्यात हलगर्जीपणा झाल्याने द्रुतगतीवरील घाट क्षेत्रात दरडीचा धोका वाढला आहे़ लवकरच धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होईल, असा दावा शासकीय यंत्रणा करत असल्या, तरी साधारण पावसाळा संपेपर्यंत या मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायम राहणार, असेच चित्र आहे़
मुंबई-पुणे हा प्रवास जलदगती व विनाअडथळा व्हावा याकरिता वाहनचालक व नागरिक द्रुतगती महामार्गावर टोल भरून प्रवास करण्याला प्राधान्य देतात़ प्रत्यक्षात मात्र येथे परिस्थिती वेगळी असून, या मार्गावर मागील दीड महिन्यापासून प्रवाशांना टोल भरून मनस्ताप विकत घ्यावा लागतो आहे़ २२ जून रोजी या महामार्गावर या वर्षीची पहिली दरड पडली. त्यानंतर पाहता पाहता हा मार्ग दरडग्रस्त बनला़ दीड महिन्यात या मार्गावर चार वेळा दरडी कोसळल्या.

रात्री-अपरात्री एखाद्या वाहनावर दरड कोसळून काही जीवितहानी झाली, तर जबाबदारी कोण घेणार? या निरुत्तरित प्रश्नामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील किमान दोन लेन पावसाळा संपेपर्यंत खंडाळा एक्झिट व खंडाळा बोगदा व आडोशी बोगद्याजवळील भागात बंदच राहण्याचे चिन्ह आहे़ याबाबत अधिकृतरीत्या कोणी बोलत नसले, तरी साधारण स्थिती तशीच राहण्याची शक्यता कोणी नाकारत नाही़ सातत्याने मार्गावर दरडी कोसळत असल्याने मार्गावरील वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वळविल्याने लोणावळा, खंडाळा व खोपोलीतील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

दिवस उजाडल्यापासून रात्री उशिरापर्यंत तिन्ही शहरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत़ द्रुतगती महामार्गाची पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेच्या दोन लेन पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी व एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरण्यात येत असल्याने द्रुतगतीवर दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या लांबवर रांगा लागत आहेत. यामुळे वाहनचालक व प्रवासी अक्षरश: हैराण झाले असताना, टोलनाक्यांवर मात्र वसुली सुरू आहे़ वाहतूक बदलांसाठी व कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलिसांसह बाहेरगावावरून मोठ्या प्रमाणात पोलीस महामार्गावर तैनात करण्यात आले आहेत. टोल आयआरबी वसूल करते, मात्र शिव्याशाप वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिसांना मिळत आहेत़ टोल भरून द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जागोजागी वाहतूक बदलामुळे वाहने राष्ट्रीय महामार्गावर घ्यावी लागत असल्याने या बदलाच्या सूचना देणाऱ्या पोलिसांनाच प्रवाशी लाखोली वाहत आहेत़

दरडी पडण्याची दुर्घटना घडली, की राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे खंडाळा घाटात येतात़ नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी देत वाहतूक बदलाच्या काळात वाहनचालकांना टोलमुक्त प्रवास देण्याची घोषणा ते करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कोणालाही टोलमुक्ती मिळत नाही़ नियोजित दरांप्रमाणे वाहनचालकांकडून वसुली सुरूच आहे़
द्रुतगती महामार्गावर दरडी काढण्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्वपदावर येईपर्यंत वाहनांना टोलमुक्ती देण्याची घोषणा होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी टोलमुक्तीचे बॅनर लावत राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न केला़ आपल्याच नेत्यांच्या पाठपुराव्याने वाहनांना टोलमाफ ी झाली असल्याचा दावा करत हे बॅनर लावण्यात आले आहेत़ प्रत्यक्षात मात्र त्यांच्यापैकी किती जणांनी टोलनाक्यावर उभे राहत टोलवसुली बंद झाली आहे, याची खात्री केली, हा संशोधनाचा विषय आहे़

Web Title: Advantage to IRB; Displeasure passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.