पुणे: महापालिकेमध्ये गेली तीन-चार वर्षांपासून प्रशासक राज आहे, मग आताच रस्ते आणि चेंबरची कामे कशी केली जात आहेत, एवढे दिवस का झाली नाहीत, असा प्रश्न उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी भर कार्यक्रमात महापालिका आयुक्तांना विचारला.
पुणे महापालिका, पुणे पोलिस व महामेट्रो यांच्या वतीने शहरातील विविध ५३ प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. राष्ट्रीय पातळीवरील पुणे ग्रँड चॅलेंज ही सायकल स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी २०२६ मध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. यासाठी शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण व चेंबर समपातळीवर आणण्याची कामे केली जात आहेत. या कामांचा दाखला देत अजित पवार यांनी ही कामे यापूर्वी का झाली नाहीत? असा प्रश्न महापालिका आयुक्तांना उद्देशून उपस्थित केला. ते म्हणाले, पुणेकरांना सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असतात. अधिकारी काम करताना चुकतात, निवृत्त होतात आणि मस्त जीवन जगतात. जनता मात्र, लोकप्रतिनिधींना दोष देतात. आम्ही विकासकामे करण्याचे काम करत असतो, शेवटी पुणेकर निवडणुकीत कुणाची बटने दाबतात, ते लवकरच कळेल, असेही अजित पवार म्हणाले.