पक्षचिन्हासाठी रंगली प्रशासकीय लढाई; आरोप- प्रत्यारोप

By Admin | Updated: February 7, 2017 03:23 IST2017-02-07T03:23:23+5:302017-02-07T03:23:23+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना अखेर भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह मिळाले आहे

Administrative battle for party icon; Accusation | पक्षचिन्हासाठी रंगली प्रशासकीय लढाई; आरोप- प्रत्यारोप

पक्षचिन्हासाठी रंगली प्रशासकीय लढाई; आरोप- प्रत्यारोप

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना अखेर भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह मिळाले आहे. आॅनलाईन अर्ज राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून भरल्याने छाननीमध्ये भोसले यांना भाजपाने दिलेला एबी फॉर्म बाद ठरविण्यात आला होता. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी नाकारली गेल्यावर भोसले यांना भाजपाचा एबीफॉर्म मिळाला. मात्र, त्या अगोदरच सकाळी सतीश बहिरट यांना भाजपने एबीफॉर्म दिला होता. त्यांनी अर्जही भरला होता. छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी मंजूर करण्यास नाकारले होते. त्यावर महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मिळावे, असे पत्र पाठविले होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी भोसले यांना भाजपाची उमेदवारी देण्यात यावी, असा निर्णय घेतला. तसे पत्र पालिका आयुक्तांना सोमवारी पाठविले. त्यानुसार भोसले यांना भाजपाचे ‘कमळ’ हे चिन्ह देण्यात आले. या निर्णयासाठीच शनिवारी झालेल्या छाननीनंतर तब्बल ७२ तास अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे़


शहरातील १० ते १५ उमेदवारांना ए व बी फॉर्मच्या अडचणींमुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळू शकली नाही. तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागले आहे. प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवार रवी धंगेकर यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत पत्र दिले असतानाही त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. निवडणूक आयोगाने रेश्मा भोसले यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे भरला जाऊ शकला नसल्याचे मान्य करून त्यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी बहाल केली आहे. हाच न्याय इतर पक्षाच्या उमेदवारांना लावून तांत्रिक कारणामुळे बाद झालेली त्यांची पक्षाची अधिकृत उमेदवारी पुन्हा बहाल करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. रेश्मा भोसले यांना आणि आम्हाला वेगळा न्याय का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

आॅनलाईन अर्जाची मुदत संपल्याने रेश्मा भोसलेंना विशेष सवलत
पुणे : महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ ड मध्ये रेश्मा भोसले यांना भाजपाकडून अर्ज भरायचा होता, त्या वेळी दुपारचे दोन वाजल्याने आॅनलाईनची मुदत संपून गेली होती. मात्र, आॅफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची मुदत ३ वाजेपर्यंत होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून विशेष मार्गदर्शन घेऊन विशेष बाब म्हणून रेश्मा भोसले यांना सवलत देण्यात आल्याचे स्पष्टीकरण महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने व महापालिका आयुक्तांनी नियमबाह्य पद्धतीने रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी दिली असल्याचा तसेच सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, कुणाल कुमार यांनी याबाबत झालेल्या प्रक्रियेचा खुलासा केला आहे. आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपाचे ए व बी फॉर्म सादर केलेल्या रेश्मा भोसले आणि सतीश बहिरट या दोघांची पक्षाची उमेदवारी रद्द करून भाजपाचे चिन्ह गोठविले होते़ हा निर्णय त्यांनी शनिवारी रात्री ८ वाजता दिला होता़ याच वेळी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट आणि सतीश बहिरट यांनी या निर्णयाची प्रत मिळावी, अशी मागणी केली होती़ परंतु, त्यांना ती देण्यात आली नाही़ रविवारीही त्यांनी मागणी केल्यावरही ती दिली गेली नाही़
महापालिका आयुक्तांनी रविवारी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून या प्रकरणात मार्गदर्शन करावे, अशी विचारणा केली होती़ आयुक्तांच्या पत्रानुसार निवडणूक आयोगाने या प्रकरणाची पडताळणी करून सोमवारी भोसले यांना भाजपाच्या उमेदवार ठरवून त्यांना चिन्ह द्यावे, अशा आदेशाचे पत्र कृणाल कुमार यांना पाठविले़ सोमवारी दुपारी उमेदवार यादीमध्ये खाडाखोड करून त्यात रेश्मा भोसले यांच्यापुढे ‘भाजपा’ असे लिहून त्यानंतर यादी प्रसिद्ध करण्यात आली़

रेश्मा भोसले यांना दोन वाजल्यानंतर भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. तोपर्यंत निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद झाली होती, तसेच आॅनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. मुदत ३ वाजेपर्यंत आहे; त्यामुळे आम्हाला अर्ज भरता आला नाही. यात उमेदवाराचा दोष नाही, अशी बाजू उमेदवारांकडून मांडण्यात आली होती. आॅनलाईन प्रक्रिया पहिल्यांदाच राबविण्यात येत असल्याने ही परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाचा अभिप्राय मागविण्यात आला. निवडणूक आयोगाने सोमवारी पत्र पाठवून रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
- कुणाल कुमारप्रभाग क्रमांक ७ ड मधील रेश्मा भोसले व सतीश बहिरट या दोघांना देण्यात आलेल्या ए व बी फॉर्मबाबत महापालिका आयुक्तांशी फोनवरुन मार्गदर्शन घेतले़ त्याबाबतचा निर्णय जाहीर केला व त्यानंतर त्याची माहिती अवलोकनार्थ पाठविण्यात आली होती़ कोणतेही लेखी मार्गदर्शन मागितले नव्हते़
- विजया पांगारकर,
निवडणूक निर्णय अधिकारी, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Administrative battle for party icon; Accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.