आॅडिटला या, अन्यथा मुंबईला जावे लागेल, पुरंदरच्या शिक्षण विभागाची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:37 IST2017-09-11T03:37:11+5:302017-09-11T03:37:42+5:30
गेल्या ७ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यभरात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणी परीक्षा सुरू आहेत. अशातच शनिवारी (दि.९) पुरंदरच्या शिक्षण विभागाने सोमवारी (दि.११) तालुक्यातील सर्वच शाळांचे आॅडिट करण्यात येणार असल्याचे फर्मान काढल्याने विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी होणार, की शाळांचे आॅडिट? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आॅडिटला या, अन्यथा मुंबईला जावे लागेल, पुरंदरच्या शिक्षण विभागाची मनमानी
- बी. एम. काळे
जेजुरी - गेल्या ७ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यभरात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणी परीक्षा सुरू आहेत. अशातच शनिवारी (दि.९) पुरंदरच्या शिक्षण विभागाने सोमवारी (दि.११) तालुक्यातील सर्वच शाळांचे आॅडिट करण्यात येणार असल्याचे फर्मान काढल्याने विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी होणार, की शाळांचे आॅडिट? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. जे शिक्षक याला हजर राहणार नाहीत त्यांना थेट मुंबईत पाठवण्याचे फर्मान काढण्यात आल्याने शिक्षक कोंडीत सापडले आहेत.
गेल्या ७ सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनाची संपूर्ण राज्यात एकाच वेळी इयत्ता दुसरी ते आठवी या वर्गांच्या पायाभूत परीक्षा शालेय वेळेत सुरू आहेत. यात विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक, कृती या घटकांचे परीक्षण केले जात आहे. तसेच सर्व केंद्रप्रमुखांनाही पायाभूत परीक्षा घेण्यासाठी माध्यमिक शाळांतील जास्त पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षण करुन परीक्षा घेण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनाने काढले आहेत. संपूर्ण दिवसाचे नियोजन यापूर्वीच ठरलेले आहे. मात्र हे नियोजन केलेले असतानाच अचानक सोमवारी सकाळी ११ ते १ या वेळेत ही परीक्षा घेऊन दुपारी २ वाजता शाळेचे संपूर्ण रेकॉर्ड घेऊन पुरंदर पंचायत समितीत आॅडिटसाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशाने शिक्षकांना बोलावण्यात आले आहे. जे येणार नाहीत त्यांना संपूर्ण रेकॉर्ड घेऊन आॅडिट करण्यासाठी मुंबईला (आरएसडी अँड असोसिएट्स कार्यालय) जाऊन आॅडिट करून घ्यावे लागेल अशी तंबीही देण्यात आलेली आहे. यामुळे ऐनवेळी होणाºया आॅडिटमुळे मुख्याध्यापकांची धावपळ सुरू झाली आहे. या बदलामुळे २ तासांमध्ये गडबडीत परीक्षा कशी घेणार? असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला असून ते कोंडीत सापडले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी नियुक्त केलेल्या लेखापरीक्षक यांनी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत १ लाख रुपये खर्चावरील गट व समूह साधन केंद्र, शाळा व्यवस्थापन समिती यांनी आवश्यक माहितीसह लेखापरीक्षणासाठी पंचायत समितीमध्ये उपस्थित राहावे याबाबत जिल्हा परिषदेने २/९/२०१७ चे पत्रानुसार कळविले होते. या पत्रानुसार पुरंदरच्या शिक्षण विभागाने कार्यवाही करीत तसे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र या पत्राचा संदर्भ देत शुक्रवारी (दि. ८) पुरंदरच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीने सर्व शाळांना सोमवारी आॅडिटसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पत्र तत्परतेने केंद्रप्रमुखांनी ‘व्हॉट्सअॅप’द्वारे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या ग्रुपवर पाठवले आहेत. यामुळे एकच धांदल उडाली आहे.
पासबुक कधी अद्ययावत करणार...?
सोमवारी दुपारी आॅडिटला जावे लागणार म्हणून शिक्षक बँकेत जाऊन पासबुक अपडेट करणार, की शासनाची पायाभूत परीक्षा घेणार? प्रत्यक्षात प्राप्त अनुदान विवरणाचे आदेश केंद्रप्रमुखांनी शाळांपर्यंत पोहोच करणे आवश्यक आहे. या अनुदानाचे विवरण आदेश शाळापर्यंत पोहोचलेलेच नाहीत. त्यामुळे आलेल्या रकमांबाबत संभ्रम असल्याने बºयाच रकमा अखर्चित स्वरूपात आहेत. रेकॉर्ड अपूर्ण आहेत. कोणत्याही मुख्याध्यापकांना आर्थिक व्यवहार कसे करावेत, कॅशबुक, लेजर, नमुना नंबर ३२, ३३ हे अद्ययावत कसे ठेवावेत याबाबत अनेक केंद्रप्रमुखांकडून मुख्याध्यापकांना मार्गदर्शनच केलेले नाही. यामुळे आॅडिटला सामोरे कसे जावे याचीच धास्ती निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्याला वेगळा न्याय का?...
या आॅडिटसंदर्भात जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून १ लाख रुपये खर्चाच्या पुढील शाळांचे आॅडिट केले जात आहे. याशिवाय सध्या सुरू असलेल्या परीक्षांचा विचार करता हे आॅडिट पुढे ढकलण्यात आलेले आहे. मात्र, पुरंदरला वेगळा नियम करण्यामागील गौडबंगाल काय? अधिकाºयांची मनमानी का? संपूर्ण राज्यात एकाच वेळी पायाभूत परीक्षा सुरु असताना परीक्षेच्या वेळेमध्ये आॅडिटच्या नावाखाली बदल करणे तालुका प्रशासनाला अधिकार आहेत का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
परीक्षा अधांतरी
सोमवारी (दि.११) होणारी पायाभूत चाचणी परीक्षा नियोजनानुसार होणार, की दुपारनंतर, ३० ते ३५ किलोमीटर व दळणवळणाच्या सोयी सुविधा नसलेल्या ठिकाणावरून धावपळ करुन येणाºया संपूर्ण तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या शाळांचे आॅडिट केले जाणार का? याबाबत प्रशासन म्हणून गटशिक्षणाधिकारी तर वरिष्ठ म्हणून शिक्षण संचालक काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पायाभूत चाचणी परीक्षा ही अत्यंत महरत्वाची परीक्षा आहे. या कालावधीत मुख्याध्यापकांनी शाळेवर थांबून परीक्षेचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशासनाने आॅडिटच्या वेळेत बदल करुन पुढे घ्यावे. महादेवराव माळवदकर, सहसचिव महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती
ही परीक्षा महत्वाची असून यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे आपणं संबंधित शिक्षणाधिका-यांना परीक्षेनंतर आॅडिट घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सुनिल मगर, शिक्षण संचालक,
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद