केवळ दहा दिवसांत सक्रिय रुग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:16+5:302021-03-15T04:11:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रज्ञा केळकर पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. ...

Active patients doubled in just ten days | केवळ दहा दिवसांत सक्रिय रुग्ण दुप्पट

केवळ दहा दिवसांत सक्रिय रुग्ण दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रज्ञा केळकर

पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच शहरात रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. केवळ १० दिवसांमध्ये शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. एका आठवड्यात पॉझिटिव्हिटी दरही तब्बल ६ टक्क्यांनी वाढला आहे.

युरोपियन देशांप्रमाणे भारतातही कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने रुग्णसंख्येच्या दृष्टीने दिलासादायक ठरले. या काळात दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले, लोक घराबाहेर पडू लागले. कोरोना आटोक्यात येतो आहे, असे वाटत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली आहे. ८ मार्च ते १४ मार्च या आठ दिवसांमध्ये शहरात तब्बल १०,००० कोरोनाग्रस्त रुग्णांचे निदान झाले आहे. पुढील एक महिना रुग्णसंख्या झपाट्याने वाढणार असल्याचा अंदाज विविध यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२० प्रमाणे पुन्हा संसर्गाचा उद्रेक अनुभवायचा नसेल तर नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी दर ११.६८ टक्के इतका होता. या आठवड्यात शहरात ५६२८ कोरोनाग्रस्त रुग्णांचे नव्याने निदान झाले. दुस-या आठवड्यात पॉझिटिव्हिटी दर १७.५१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर आठवड्याभरात ९८७३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ, रुग्णवाढीचा वेग एका आठवड्यात दुप्पट झाला आहे. लोकांचा एकमेकांशी वाढलेला संपर्क, उपाययोजनांबाबत दिसणारा निष्काळजीपणा, विषाणूचे नवे स्टेन यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मे महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत हा उद्रेक असाच कायम राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

------------------

सक्रिय रुग्ण झाले दुप्पट

महापालिकेच्या दैनंदिन अहवालानुसार, ३ मार्च रोजी शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ५५५१ इतकी होती. १४ मार्च रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ११,५९० इतकी आहे. म्हणजेच, दहा दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या महिन्याभरात चाचण्यांचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. १५-२१ फेब्रुवारी या कालावधीत शहरात २७,३१९ चाचण्या झाल्या. ८ मार्च ते १४ मार्च या कालावधीत चाचण्यांची संख्या ५६,३८४ इतकी होती. रविवारी १७४० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ८५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. गंभीर रुग्णांची संख्या ३५५ इतकी आहे.

----------------------------

कोरोनाग्रस्तांची संख्या का वाढतेय?

* सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ६०-६५ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. कोरोनाची भीती कमी झाल्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांकडून आयसोलेशनचे नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत. रुग्ण घरातील इतर सदस्यांबरोबर मिसळत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. बरेचदा घरातील रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत असल्याची उदाहरणे पहायला मिळत आहेत.

* घरातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तरी तिच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती चाचणीसाठी आपणहून पुढे येत नाही. त्यामुळे त्यांच्यात कोरोनाची लक्षणे जाणवत नसली किंवा लक्षणे सौम्य असली तरी त्यांच्याकडून इतरांना होणारा संक्रमणाचा धोका कमी झालेला नसतो. या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मिसळत असल्याने एकमेकांकडून प्रसार होण्याचे प्रमाण वाढते.

* कोरोनाच्या विषाणूची जनुकीय रचना बदलल्यामुळे प्रभाव काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या तुलनेत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, कणकण अशी लक्षणे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. मात्र, व्हायरल इन्फेक्शन असल्याचे सरसकट निदान केले जात असल्याने कोरोना चाचण्या करून घेण्याचे प्रमाण कमी आहे.

-------------------

महिन्याभरातील पॉझिटिव्हिटी रेट :

कालावधी चाचण्या कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

१-७ फेब्रुवारी २२,५६४ १२७५ ५.६५

८-१४ फेब्रुवारी २१,२४८ १८१६ ८.५४

१५-२१ फेब्रुवारी २७,३१९ २९७० १०.८७

२२-२८ फेब्रुवारी४४,७१२ ४३३८ ९.७०

१ मार्च-७ मार्च४८,१५६ ५६२८ ११.६८

८ मार्च-१४ मार्च५६,३८४ ९८७३ १७.५१

Web Title: Active patients doubled in just ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.