आमदार भोसलेंची कृती गद्दार शब्दालाही लाज वाटणारी
By Admin | Updated: February 7, 2017 02:57 IST2017-02-07T02:57:24+5:302017-02-07T02:57:24+5:30
गद्दार शब्दालाही लाज वाटावी असे कृत्य आमदार अनिल भोसले यांनी केले आहे. एका घरात आमदारकी दिल्यावर त्याच घरात नगरसेवक पद देऊ नये हे अपेक्षितच आहे.

आमदार भोसलेंची कृती गद्दार शब्दालाही लाज वाटणारी
पुणे : गद्दार शब्दालाही लाज वाटावी असे कृत्य आमदार अनिल भोसले यांनी केले आहे. एका घरात आमदारकी दिल्यावर त्याच घरात नगरसेवक पद देऊ नये हे अपेक्षितच आहे. मात्र त्यांना समजले नाही. गद्दारी केली. त्यांना नोटीस बजावू, काय उत्तर देतात ते पाहू व कारवाई करू अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केलेल्या आमदार भोसले यांचा समाचार घेतला.
महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला सारसबाग चौकात पवार यांच्या हस्ते सोमवारीसायंकाळी सुरूवात झाली. सत्ता बहुजनांच्या हातात देणार की मुठभरांच्या असा सवाल त्यांनी केला.
पवार म्हणाले, ‘‘ते सत्तेवर आल्यापासून जातीयवाद, धर्मवाद सुरू झाला आहे. पैसे घेऊन तिकीट वाटप करतात. गायीच्या कारणावरून गरीबांची हत्या करतात. तडीपार केलेल्या गुंडांचे तिथे स्वागत केले जाते, त्यांना उमेदवारी दिली जाते. मुख्यमंत्री राज्यातील जनतेचे नाहीत तर गुंडांचे आहेत असे त्यांचा मित्रपक्षच सांगतो. अशा लोकांच्या हाती महापालिकेची सत्ता द्यायची का याचा पुणेकरांनी विचार करावा.’’
राष्ट्रवादीचे सत्तेच्या गेल्या १० वर्षात अनेक विकासकामे केली. ती पुणेकरांसमोर आहेत. मेट्रो आम्ही कात्रज ते निगडी अशी मान्य केली होती. त्यांनी घाईघाईत स्वारगेट ते निगडी असा मार्ग मान्य केला. त्याला विलंब लावला. केंद्र व राज्यातील सत्तेच्या अडीच वर्षात त्यांनी पुण्यासाठी अभिमान वाटावे असे काय केले ते जाहीर करावे असे आव्हान पवार यांनी दिले. (प्रतिनिधी)