मोहितेंसह चौघांच्या अर्जावर हरकत

By Admin | Updated: August 11, 2015 03:41 IST2015-08-11T03:41:52+5:302015-08-11T03:41:52+5:30

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा थरार दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी छाननीच्या दिवशी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या अर्जासह चार जणांच्या

Action on the four-petitioner with Mohiten | मोहितेंसह चौघांच्या अर्जावर हरकत

मोहितेंसह चौघांच्या अर्जावर हरकत

राजगुरुनगर : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा थरार दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी छाननीच्या दिवशी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या अर्जासह चार जणांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. तर, दोन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. हरकतीवर उद्या १२.३० वाजता सुनावणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी सांगितले.
छाननीमध्ये प्रीतम परदेशी आणि ज्ञानोबा शेवकरी यांचे अर्ज बाद झाले आहेत. परदेशी यांनी अनुसूचित जाती मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता; परंतु त्यांच्याकडे सक्षम अधिकाऱ्यांचा जातीचा दाखला नव्हता म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी त्यांचा अर्ज नामंजूर केला. तसेच, शेवकरी यांच्याकडे बाजार समितीची थकबाकी असल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
बाजार समितीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दाखल झालेल्या अर्जांवरूनच दिसत होती. कारण, एकूण १९ जागांसाठी तब्बल १७३ जणांनी २२३ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची आज छाननी झाली. छाननीमध्ये एकमेकांवर हरकती येणार, याची कुणकुण बहुधा आधीच दोन्ही बाजूंच्या नेत्यांना असावी. कारण दोन्ही बाजूंचे उमेदवार वकिलांसह हजर होते.
ग्रामपंचायत मतदारसंघाच्या आर्थिक दुर्बल राखीव जागेकरिता अर्ज दाखल केलेले हृषीकेश रमेश पवार यांनी खरी माहिती आणि वस्तुस्थिती लपवून आर्थिक दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र मिळविले म्हणून त्यांचा अर्ज बाद ठरवावा, अशी हरकत बाळासाहेब बाबूराव जाधव यांनी घेतली आहे. व्यापारी-अडते मतदारसंघातून रवींद्र हिरामण बोराटे यांच्या अर्जावर कुमार धोंडिबा गोरे यांनी हरकत घेतली आहे. ते कार्यक्षेत्रात राहत नाही म्हणून त्यांची हरकत आहे. तर, रवींद्र बोराटे यांनी कुमार धोंडिबा गोरे आणि महेंद्र हरिभाऊ गोरे यांच्या अर्जावर हरकत घेतली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या कुटुंबीयांकडे अडतीची अनुज्ञप्ती असून, त्यांनी हमाली पोटनियमपेक्षा जास्त कपात केली आणि ती बाजार समितीत भरली नाही म्हणून ते थकबाकीदार ठरतात, अशी त्यांची हरकत आहे. या हरकतींवर उद्या सुनावणी होईल, असे मुकुंद पवार यांनी सांगितले. आज उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी निवडणूक निर्णय अधिकारांच्या कार्यालयाबाहेर झाली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन पोलीस निरीक्षकांसह ५ पोलीस उपनिरीक्षक आणि ४० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: Action on the four-petitioner with Mohiten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.