सहा शिक्षकांची विनावेतन अर्जाशिवाय दांडी , गटविकास अधिकारी मनोज जाधव यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:41 IST2017-10-16T02:41:24+5:302017-10-16T02:41:33+5:30
वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची विनावेतनाची कारवाई गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी नुकतीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सहा शिक्षकांची विनावेतन अर्जाशिवाय दांडी , गटविकास अधिकारी मनोज जाधव यांची कारवाई
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची विनावेतनाची कारवाई गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी नुकतीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुरुवारी (दि. १२) तालुक्यातील काही शाळांना भेटी दिल्या. यादरम्यान काही शाळांचे शिक्षक विनापरवाना गैरहजर राहिल्याबद्दल त्यांची रजा विनावेतन करण्यात आली आहे. शाळेत कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज ठेवला नव्हता, तर विनापरवना अनुपस्थित राहिल्याचे गटविकास अधिकारी मनोज जाधव यांच्या निर्दशनास आले, यावरून त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम नं. ३ चा भंग केलेला असल्याने शिस्तभंग कारवाईस पात्र ठरले आहेत. यामध्ये शिवाजी आनंदा लव्हटे, गोविंद महादेव केंद्रे, शंकर बढे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालवड), सुनील अविनाश खंदाडे (जिल्हा परिषद शाळा, कोंढाळकरवाडी), अनंता खाटपे (जिल्हा परिषद खोपडेवाडी), ए. एस. वाडेकर (जिल्हा परिषद
शाळा, नाळवट) आदी शिक्षकांचा समावेश आहे.
गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी तालुक्यातील शिक्षकांवर केलेल्या या कारवाईमुळे शिक्षकवर्गात सध्या भीतीचे वातावरण असल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय शनिवारी सकाळी शाळा असल्याने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी वेळेत उघडण्यात आल्या होत्या, तर जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक वेळेवर उपस्थित राहिले होते. तालुक्यातील शिक्षकांनी या गोष्टीचा धसका घेतला आहे. सर्व शिक्षक आपापल्या शाळेत वेळेवर जायला लागले असून अध्यापन,स्वच्छता, टापटीपपणा, विविध नोंदी अद्ययावत करण्याच्या मागे लागले आहेत.
वेतनवाढ का रोखू नये...?
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोती येथील शाळेस भेट दिली असता येथील शिक्षकांच्या कामात अनियमितता आढळून आली. यामध्ये शाळेच्या वेळेत वर्गाध्यापन न करता कट्ट्यावर बसून सामूहिक गप्पा मारणे, विषयनिहाय अभ्यासक्रमाचे न नियोजन करणे, वर्गसजावट, वर्गव्यवस्था, स्वच्छता टापटीप आदी गोष्टीचा अभाव असणे विद्यार्थी गैरहजर असताना हेतूपुरस्सर हजेरीपटावर विद्यार्थी हजर असल्याची नोंद करणे, तसेच शालेय कामकाज असमाधानकरक अशी विविध कारणांच्या आधारे शालेय कामकाजात असभ्य व हलगर्जीपणा केल्याचे गटविकास अधिकारी यांना दिसून आले.
जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम नं. ३ चा भंग केलेला आहे. त्यानुसार आपली वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद का करण्यात येऊ नये? असा सवाल निर्माण करून याचा खुलासा सात दिवसांच्या आत संबंधित केंद्रप्रमुखांच्या शिफारसीसह करावा, असे सांगण्यात आले आहे. हा खुलासा असमाधानकारक नसल्यास किंवा विहीत मुदतीत पंचायत समितीस प्राप्त न झाल्यास सूचित कारवाई करण्यात येईल, असे पत्र जिल्हा परिषद शाळा वरोती येथील उपशिक्षक ज्ञानेश्वर वणवे, प्रशांत भापकर, हनुमान पंजाबराव जाधव, हरिप्रसाद धनंजय सवणे आदी शिक्षकांना गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी दिले आहे.