प्रत्यक्ष उपस्थिती आणि सहभागातून अभिनयाचे धडे गिरवता येणार ; अभिनय प्रमाणपत्र वर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:11 IST2021-09-23T04:11:40+5:302021-09-23T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या कोरोनामुळे नाट्यगृह, चित्रपटगृह बंद असली तरी कलेचे शिक्षण थांबलेले नाही. सावित्रीबाई ...

प्रत्यक्ष उपस्थिती आणि सहभागातून अभिनयाचे धडे गिरवता येणार ; अभिनय प्रमाणपत्र वर्ग सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या कोरोनामुळे नाट्यगृह, चित्रपटगृह बंद असली तरी कलेचे शिक्षण थांबलेले नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्यावतीने अभिनय प्रमाणपत्र वर्ग सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचे वर्ग १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, त्यासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष उपस्थिती आणि सहभागातून अभिनयाचे धडे गिरवता येणार आहेत.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेने आतापर्यंत विविध कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. कलाक्षेत्रात जम बसवू पाहणाऱ्या आणि या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी विविध मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्रे आणि कार्यशाळांचेही आयोजन संस्था करते. याच प्रशिक्षणाचा भाग म्हणून संस्थेने ललित कला केंद्राच्या सहाय्याने हा अभ्यासक्रम सुरू केला असल्याची माहिती सेंटरच्या सचिव शुभांगी दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा अर्धवेळ स्वरूपाचा अभ्यासक्रम असून, याचा कालावधी पंधरा आठवड्यांचा आहे. या अभ्यासक्रमासाठी सोळा वर्षांवरील सर्व व्यक्ती अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. अभ्यासक्रमासाठी अभिनयाचा पूर्वानुभव असणे आवश्यक नाही. अभिनयाचे प्रशिक्षण देणारे वर्ग मोठ्या संख्येने सुरू झालेले असताना प्रमाणीकरण असलेल्या संस्थांनी अभ्यासक्रम सुरू करण्याला महत्त्व आहे, असे ललित कला विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी सांगितले. ललित कला केंद्राचे माजी विभागप्रमुख सतीश आळेकर यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे.