आचार्य, कदम, सहाय ठरले ‘स्मार्ट पुणेकर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2015 03:09 IST2015-08-14T03:09:54+5:302015-08-14T03:09:54+5:30
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहर कसे, यासाठी महापालिकेकडून घेण्यात आलेल्या ‘माझं स्वप्न - स्मार्ट पुणे’ स्पर्धेत मिलिंद आचार्य यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे

आचार्य, कदम, सहाय ठरले ‘स्मार्ट पुणेकर’
पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहर कसे, यासाठी महापालिकेकडून घेण्यात आलेल्या ‘माझं स्वप्न - स्मार्ट पुणे’ स्पर्धेत मिलिंद आचार्य यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर शाहूराज कदम आणि प्रशांत सहाय यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला असून, हे तिघेही स्मार्ट पुणेकर ठरले आहेत. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या विजेत्यांची नावे घोषित केली. विशेष म्हणजे ही तीनही विजेते अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.
स्मार्ट सिटीत नागरिकांच्या सहभागाला सर्वाधिक महत्त्व असल्याने पुणे महापालिकेने नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या. आॅनलाइन स्वरूपातील या स्पर्धेत सुमारे सहा हजार दोनशे नागरिकांनी सूचना पाठविल्या. त्यातील, सर्वोत्तम ३० सूचना निवडण्यात आल्या आणि त्यावर पुन्हा नागरिकांची मते मागविण्यात आली. त्यातील, १० स्पर्धकांच्या मुलाखती आणि सादरीकरण घेण्यात आले होते. त्यानुसार, सुमारे ७ हजार नागरिकांनी या प्रमुख दहा सूचनांवर मतदान करून आपले मत नोंदविल्यानंतर सर्वाधिक मते मिळणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी दिली. प्रथम पुरस्कारासाठी २५ हजार, तर द्वितीय व तृतीय पुरस्कारासाठी अनुक्रमे १५ आणि १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर या सूचनांचा समावेश स्मार्ट सिटीसाठीच्या प्रस्तावात करण्यात येणार असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीबाबत केंद्र शासनाकडून येत्या एक-दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे एकत्र असतील का हे चित्र स्पष्ट होईल. मात्र, असे असले तरी, लोकसहभागासाठी महापालिकेने ही स्पर्धा घेतली असल्याने त्याचा बक्षीस वितरण समारंभ थांबविला जाणार नसल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीतील समावेशावर जोवर अंतिम शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत हे पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली होती. महापौरांनी मात्र विरोधी पक्षनेत्यांची मागणी फेटाळून लावत स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचा समावेश झाला नाही, तरी या नागरिकांच्या सूचना शहराच्या हितासाठी आहेत. त्यामुळे त्यांची पालिकेकडूनही अंमलबजावणी शक्य आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कोणत्याही स्थितीत रद्द करणार नसल्याचे धनकवडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)