उघड्या वायरिंगमुळे अपघाताचा धोका

By Admin | Updated: May 23, 2016 01:34 IST2016-05-23T01:34:14+5:302016-05-23T01:34:14+5:30

बांधकामाचा पडलेला राडारोडा, तुषार सिंचनात साचलेले पाणी, विद्युतखांबांवरील निघालेले वायरिंग, झाडांच्या तुटलेल्या फांद्या

Accidental risk due to open wiring | उघड्या वायरिंगमुळे अपघाताचा धोका

उघड्या वायरिंगमुळे अपघाताचा धोका

निगडी : बांधकामाचा पडलेला राडारोडा, तुषार सिंचनात साचलेले पाणी, विद्युतखांबांवरील निघालेले वायरिंग, झाडांच्या तुटलेल्या फांद्या, तुटलेले बाकडे अशी अवस्था आकुर्डी प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाची झाली आहे. या सर्व बाबींमुळे गैरसोय निर्माण होत असून, लवकारात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.आकुर्डी-प्राधिकरणातील पेठ क्रमांक २८मध्ये ३.६७ हेक्टर जागेवर महापालिकेने उद्यान विकसित केले आहे. त्याची देखभाल ठेका पद्धतीने देण्यात आली आहे. या उद्यानात नक्षत्रांनुसार विविध झाडे लावण्यात आली आहे. यामुळे लांबून लोक या उद्यानात येतात.
उद्यानाचा परिघ मोठा असल्याने सकाळी व सायंकाळी व्यायाम करणाऱ्या व फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांची येथे गर्दी असते. उद्यानाला दोन बाजूने प्रवेश आहे. सकाळी सहा ते दहा व सायंकाळी चार ते सात या वेळेत उद्यान खुले राहीन, असा फलक लावला आहे. मात्र, दुपारच्या वेळीही दोन्ही फाटक उघडे असतात. यामुळे आजूबाजूच्या महाविद्यालयातील मुले-मुली दुपारच्या वेळेतसुद्धा उद्यानात दिसून येतात.
उद्यानात तुषार सिंचन उभारण्यात आले आहे. पाण्याअभावी ते सध्या बंद आहे. परंतु, याचे लोखंडी कुंपन तुटले आहे. ते धोकादायकरीत्या लोंबकळत आहे. नागरिकांना यापासून इजा संभवते. तुषार सिंचनात अनेक दिवसांपासून पाणी साचून तळे झाले आहे. त्यावर शेवाळे चढले आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. उद्यानात ठिकठिकाणी पालापाचोळा पडला आहे. झाडे वाळली आहेत.
काही ठिकाणी वाळलेल्या झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत. बांधकामाचा राडारोडा इतरत्र पडलेला दिसून येत आहे. उद्यानातील बाकडे तुटलेले आहेत. पदपथाच्या बाजूला लावण्यात आलेल्या दिव्यांच्या काचा गायब झाल्या आहेत. काही दिव्यांची मोडतोड झाली आहे, तर काहींचे दिवेच गायब आहेत. विद्युत प्रवाहाच्या वाहिनी उद्यानात मोकळ्या सोडल्या आहेत. त्यापासून शॉक लागून जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
उद्यानात आकर्षणासाठी लोखंडी सळयांच्या साहाय्याने त्यावर झाडांच्या
वेली चढवून हत्ती, उंट, घोडा अशा प्राण्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात
आल्या आहेत. मात्र, सध्या त्यावरील वेली वाळून गेल्याने प्राणी ओळखणे अवघड झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Accidental risk due to open wiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.