रेल्वेच्या जनरल डब्यात एसी, प्रवास आरामदायक अन् सुपरफास्ट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:44+5:302021-08-23T04:14:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: आता ते दिवस दूर नाहीत, जेव्हा पुणे स्थानकावरून धावणारी रेल्वे ताशी १६० किमी वेगाने ...

रेल्वेच्या जनरल डब्यात एसी, प्रवास आरामदायक अन् सुपरफास्ट होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: आता ते दिवस दूर नाहीत, जेव्हा पुणे स्थानकावरून धावणारी रेल्वे ताशी १६० किमी वेगाने धावेल आणि जनरलसह संपूर्ण गाडी ही वातानुकूलित असेल. जनरल डबा एसी केला जात आहे. तत्पूर्वी याचे प्रोटोटाइप म्हणजे डमी माॅडेल बनविण्याचे काम अंतिम टप्यात आले असून, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. मुंबई - चेन्नई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यामध्ये हा बदल केला जात आहे.
भारतीय रेल्वेने आपला प्रवास अधिक गतिमान व आरामदायक व्हावा, या करीता विविध योजनांवर काम करीत आहे. देशातील सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गाची यासाठी निवड केली आहे. हा मार्ग ताशी १६० किमी वेगासाठी फिट केला जात आहे. रेल्वे मार्ग सोबतच रेल्वे डब्यामध्ये देखील आवश्यक तो बदल केला जात आहे. या अंतर्गतच जनरल डबा एसी करणे, नवीन इकॉनॉमी डबे तयार करणे आदी कामे केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संपूर्ण एसी रेल्वे ती देखील ताशी १६० वेगाने धावणे शक्य होणार आहे.
बॉक्स १
प्रोटोटाईप दोन महिन्यांत तयार :
पंजाब येथील कपूरथला रेल कोच फॅक्टरीत जनरल डब्याचे प्रोटोटाईप तयार केला जात आहे. आणखी दोन महिन्यांत याचे काम पूर्ण होईल. एका डब्यासाठी जवळपास १ कोटी ७५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. तयार करण्यात येणारे डबे हे एलएचबी दर्जाचे असतील. प्रोटोटाईप तयार झाल्यानंतर त्याची विविध पातळीवर चाचणी घेण्यात येईल. रेल्वेच्या संशोधन संस्थे कडून म्हणजेच आरडीएसओ कडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक्षात डबे निर्मितीस सुरुवात होईल.
बोक्स २
हा बदल वेग वाढविण्यासाठी ;
मुंबई - चेन्नई, चेन्नई - कोलकाता, कोलकाता - दिल्ली व दिल्ली - मुंबई हा देशातील सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्ग समजला जातो. ह्या मार्गावरन धावणाऱ्या एक्सप्रेस, सुपरफास्ट गाडया येणाऱ्या काळात ताशी १६० किमी वेगाने धावतील.तेव्हा जनरल व द्वितीय श्रेणी स्लीपर डबे हे वेगास अडथळा ठरतील म्हणून आधीच डबे बदलले जातील.
का ठरतील अडथळा ?
गाडया वेगाने धावण्यासाठी त्या पूर्ण पने बंदिस्त असणे गरजेचे आहे. स्लीपर व जनरलचे डबे व खिडक्या उघडत असल्याने त्या वेगास मारक ठरतात. शिवाय बाहेरील धूळ आत येणे व वेगामुळे प्रवाशांच्या कानाला देखील त्रास होतो त्यामुळे सामान्य जनरल डबे हटवून त्या जागी वातानुकूलित डबे जोडले जाणार आहे. तसेच वेगामुळे रेल्वे धावताना मोठा आवाज देखील होईल. त्यामुळे हा बदल केला जात आहे.
---------------
आम्ही जनरल डब्यांचे प्रोटोटाईप बनविण्याचे काम सुरु केले आहे. दोन महिन्यांत पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यानंतर रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार डब्याचे उत्पादन सुरु करणार आहोत.
- जितेश कुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे कोच फॅक्टरी, कपुरथला, पंजाब
------------------