गर्भपाताचा आॅनलाईन बाजार
By Admin | Updated: February 13, 2016 03:22 IST2016-02-13T03:22:19+5:302016-02-13T03:22:19+5:30
डॉक्टरी सल्ल्याशिवाय गर्भपात करणे हा कायदेशीर गुन्हा असताना, आता आॅनलाईन गर्भपाताची औषधे मिळत असल्याने या कायद्यालाच आव्हान निर्माण झाले आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब

गर्भपाताचा आॅनलाईन बाजार
- पुणे, सायली जोशी-पटवर्धन
डॉक्टरी सल्ल्याशिवाय गर्भपात करणे हा कायदेशीर गुन्हा असताना, आता आॅनलाईन गर्भपाताची औषधे मिळत असल्याने या कायद्यालाच आव्हान निर्माण झाले आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच गर्भपाताची औषधे आॅनलाईन मागवून गर्भपात केले जात आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत ही बाब लक्षात आली. अनेक औषध दुकानांमध्ये ही औषधे मिळत नसल्याचे पाहणीत लक्षात आले; मात्र आॅनलाईन ही औषधे सहज उपलब्ध होत असल्याचे दिसले.
गर्भपाताची औषधे ही स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणे बेकायदेशीर आहे. तसेच ते स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही घातक आहे. औषधांच्या दुकानातही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न मिळणारी ही औषधे थेट आॅनलाईन मिळू लागल्याने गर्भपाताचा
बाजार निर्माण होण्याची भीती निर्माण
झाली आहे. तसेच यावर
कोणत्याही यंत्रणेचा
अंकुश नसल्याने फुलण्याआधीच कळ्या खुडल्या जात असल्याचे चित्र आहे.
जनरल मेडिकल स्टोअरमार्फत या औषधाची विक्री झाल्यास औषधविक्रेत्याला ठराविक दंड आणि कारावासाची शिक्षा होते. त्यामुळे औषधविक्रेत्यांकडे हे औषध मिळत नाही. काही खासगी रुग्णालयांमध्ये तसेच शासकीय रुग्णालयांमध्येही डॉक्टरांच्या चिठ्ठीने हे औषध मिळते. तसेच इतके कडक नियम असताना आॅनलाईन विक्रेते मात्र याची सर्रास विक्री करून ही औषधे थेट नागरिकांच्या घरपोच पाठवत असल्याने ही बाब धोकादायक असल्याचे दिसते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन याबाबत नेमकी कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एमटीपी कीट हे एक शेड्यूल एच ड्रग असून ते केवळ परवानगी असणारे विक्रेतेच विकू शकतात. परवानगीशिवाय हे औषध विकणाऱ्यांना दंड आणि कारावास अशी कडक शिक्षा होऊ शकते. तसेच हे औषध देणाऱ्यांना त्याची योग्य पद्धतीने नोंद करणेही आवश्यक आहे. असे असताना आॅनलाईन औषध विक्री होणे हे धोकादायक आहे.
गर्भपाताच्या गोळ्या घेण्याचे काही ठराविक नियम असून, त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायच्या असतात. यातील पहिल्या गोळ्या या गर्भपिशवी आकुंचन पावण्यासाठी असतात, तर दुसऱ्या प्रकारच्या गोळ्या या ३६ ते ४८ तासांनंतर घ्याव्या लागतात. त्यामुळे पिशवीचे तोंड उघडून गर्भ बाहेर पडण्यास मदत होते, असे औषधशास्त्राच्या तज्ज्ञांनी सांगितले.
आॅनलाईन औषध विक्रीविरोधात मागील अनेक दिवसांपासून आम्ही लढत आहोत. मात्र तरीही शासन या बाबीकडे गांभीर्याने पाहात नाही. अशाप्रकारे आॅनलाईन गर्भपात करण्याची औषधे मिळणे हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असून, त्याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. नुकतीच याविषयात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, त्यावर लवकरात लवकर कारवाई होईल, अशी आशा आहे.
- विजय चंगेडिया, केमिस्ट असोसिएशन, सचिव
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताची औषध घेणे हे रुग्णासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. औषधांच्या दुकानात ही औषधे मिळण्यास कडक नियम असतानाही अशाप्रकारे आॅनलाईन औषधे मिळणे हे धक्कादायक आहे. सल्ल्याशिवाय ही औषधे घेतल्याने महिलेला जास्तीचा रक्तस्राव, जंतूंचा प्रादुर्भाव होणे अशी लक्षणे दिसू शकतात. प्रसंगी वंध्यत्व येण्याचीही शक्यता असते.
-डॉ. वैजयंती खानविलकर, स्त्रीरोगतज्ज्ञ