आयुक्तांकडे राजकीय पक्षांचे एबी फॉर्म

By Admin | Updated: February 2, 2017 03:52 IST2017-02-02T03:52:57+5:302017-02-02T03:52:57+5:30

राजकीय पक्षांकडून उमेदवारांना ए व बी फॉर्म देण्याऐवजी त्या पक्षांचे नेमून दिलेले पदाधिकारी थेट महापालिका आयुक्तांना सर्व उमेदवारांचे ए व बी फॉर्म एकाच वेळी देऊ

AB Form of Political Parties to the Commissioner | आयुक्तांकडे राजकीय पक्षांचे एबी फॉर्म

आयुक्तांकडे राजकीय पक्षांचे एबी फॉर्म

पिंपरी : राजकीय पक्षांकडून उमेदवारांना ए व बी फॉर्म देण्याऐवजी त्या पक्षांचे नेमून दिलेले पदाधिकारी थेट महापालिका आयुक्तांना सर्व उमेदवारांचे ए व बी फॉर्म एकाच वेळी देऊ शकतील, असे आदेश बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून काढण्यात आले आहेत. पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने इतर पक्षांमध्ये जाऊन बंडखोरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा फटका बसणार आहे.
महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना राज्य निवडणूक आयोगाकडून अचानक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र आतापर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर पक्षांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने ए व बी फॉर्म देण्याच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवारांना ए व बी फॉर्मचे वाटप करून ते त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्याऐवजी
राजकीय पक्षाने निवडणुकीची उमेदवारी देण्याची जबाबदारी कोणावर सोपविली आहे ‘ए’ फॉर्ममध्ये स्पष्ट करण्यात आले असते तर ‘बी’ फॉर्ममध्ये राजकीय पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली आहे, त्याची माहिती दिलेली असते. राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ए व बी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे विहीत वेळेत जमा करणे आतापर्यंत बंधनकारक होते. ए व बी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले तरच त्यांची राजकीय पक्षाची उमेदवारीला मान्यता दिली जायची. निवडणूक आयोगाने बुधवारी अचानक या प्रक्रियेमध्येच मोठे बदल केले आहेत.
महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या उमेदवारांची नावे थेट महापालिका आयुक्तांकडे सादर करता येणार आहेत. वेळेअभावी उमेदवारांना ए व बी फॉर्म जमा करणे शक्य न झाल्यास त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे आयोगाकडून काढलेल्या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्तांकडे अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेमध्ये उमेदवारांचे ए व बी फॉर्म जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर आयुक्तांनी तत्काळ संबंधित उमेदवारांचे ए व बी फॉर्म संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवून द्यावे, असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

उमेदवारी याद्यांची प्रतीक्षा संपणार
राजकीय पक्षांकडून कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे, याची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जायची. त्यानंतर उमेदवारांना ए व बी फॉर्मचे वाटप व्हायचे. मात्र, आता अडचणीच्या जागांवरील उमेदवारांची नावे व एबी फॉर्म पक्षांकडून थेट आयुक्तांना दिले जातील. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळाली, याची माहिती आता आयुक्तांकडूनच समजू शकणार आहे. त्याचबरोबर तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात जाऊन बंडखोरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांपुढे मोठी अडचण उभी राहणार आहे.
माघारीपर्यंत चालणार याद्यांचा घोळ
एकाच पक्षाकडून एका जागेवर दोघा उमेदवारांना ए व बी फॉर्म दिले जाणे, ऐनवेळी फॉर्म मागे घेणे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आता नव्या पद्धतीनुसार आयुक्तांकडे दिल्या जाणाऱ्या याद्यांचा घोळही शेवटपर्यंत असाच सुरू राहण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Web Title: AB Form of Political Parties to the Commissioner