नेत्यांच्या गावांत निवडणुकांचे आखाडे
By Admin | Updated: July 14, 2015 00:05 IST2015-07-14T00:05:19+5:302015-07-14T00:05:19+5:30
पावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यातच जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांच्या गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे.

नेत्यांच्या गावांत निवडणुकांचे आखाडे
- सुषमा नेहरकर -शिंदे, पुणे
पावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यातच जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांच्या गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे. आपल्या गावाची सत्ता राखण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली असून, अनेकांनी गावातच ठिय्या मांडला आहे. यामध्ये जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, सदस्य यांच्या गावात या निवडणुकीचे आखाडे रंगणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या सुमारे ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीसाठी सोमवार (दि.१३) पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यातच पावसाने मोठी ओढ दिली आहे. असे असले तरी निवडणुकीला सुरुवात झाल्याने गावागावांमधील वातावरण चांगलेच तापू लागले आहे़ त्यात वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम गावपातळीपर्यंत होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे किमान आपल्या गावाची सत्ता राखण्यासाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. गावातील गटातटांचे, भावकीचे राजकारण, त्यात आता वरिष्ठ नेत्याने गावात लक्ष घातल्याने अनेक गावांतील निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. नेत्यांनी गावाच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने गावच्या पारावर निवडणुकीच्या गप्पा चांगल्या रंगल्या आहेत. तर काही नेते गावच्या राजकारणापासून दहा कोस लांब राहणेच पसंत करतात.
अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
-ग्रामपंचायत निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून, सोमवारी (दि. २०) हा
शेवटचा दिवस आहे. दरम्यान, दोन सुट्ट्या आल्याने
फक्त ६ दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी
राहत आहेत.
-पहिल्या दिवशी सोमवारी (दि. १३) बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथील उमेदवार विलास होळकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. ५० ‘आॅनलाईन’ अर्ज भरण्यात आले आहेत. तर,१९५ अर्जांची विक्री करण्यात आली, तर दौंडमध्ये २ अर्ज दाखल झाले आहेत़
-जिल्ह्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राज्यमंत्री विजय शिवतारे (हरगुडे), खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (लांडेवाडी), आमदार दत्तात्रय भरणे (भरणेवाडी), माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात ( खुटबाव), जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बादल (शिक्रापूर), कृषी सभापती सारिका इंगळे (वाळुंज), महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ (पसुरे), आंबेगाव पंचायत समिती सभापती जयश्री डोके (खडकवाडी), खेड पंचायत समिती सभापती सुरेश शिंदे (आंबोली), बारामती सभापती संभाजीराव खलाटे (कांबळेश्वर), उपसभापती दत्तू लोंढे (देऊळगाव रसाळ), माजी सभापती रणजित शिवतरे (उत्रोली), मनीषा लव्हे (गोपाळवाडी), जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे (मांजरवाडी), मनीषा कोरेकर (न्हावरा)़