लोकमत न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन : कोरेगाव मूळ–केसनंद जिल्हा परिषद गटातील उमेदवाराने आयोजित केलेल्या काशी–अयोध्या यात्रेदरम्यान हिंगणगाव (ता. हवेली) येथील शंकर बरकडे (वय ६०, रा. खोरवडा वस्ती, हिंगणगाव) हे अयोध्येत बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे गटातील गावांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने उमेदवाराकडून ‘देवदर्शन यात्रा’ या नावाने मोठ्या प्रमाणात सहलीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि. १२) रेल्वेमार्गे यात्रेकरूंना प्रथम काशी आणि नंतर अयोध्या येथे नेण्यात आले. काशी येथे दर्शन झाल्यानंतर सर्वजण अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमीचे दर्शन घेत असताना शंकर बरकडेही त्यामध्ये होते. दर्शनानंतर संपूर्ण ताफा परतीसाठी जमत असताना शंकर बरकडे कुठेही दिसून आले नाहीत. सहकाऱ्यांनी आणि आयोजकांनी परिसरात बराच शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर अयोध्या पोलिस ठाण्यात अधिकृतरीत्या बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
यात्रेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, यात्रेच्या आधी सहभागी नागरिकांकडून आयोजकांनी स्वाक्षरी घेतलेल्या फॉर्ममध्ये “हरवले, अपघात झाला किंवा काही अनर्थ घडल्यास व्यक्ती स्वतः जबाबदार राहील” असा मजकूर असल्याचे एका नागरिकाने सांगितले आहे. त्यामुळे हजारो लोकांना घेऊन जाणाऱ्या यात्रेत सुरक्षेची जबाबदारी आयोजकांनी टाळल्याचा आरोप नागरिकांमध्ये चर्चेत आहे. एकाच ताफ्यातील प्रवासी हरवणे, त्याची नोंद तातडीने न होणे आणि उपस्थिती तपासणीची व्यवस्था नसणे—या सर्वांमुळे यात्रेच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बरकडे कुटुंबियांकडून चिंताशंकर बरकडे यांच्या कुटुंबीयांनीही चिंता व्यक्त केली आहे. “माझे वडील आयोजकांचा फॉर्म भरून काशी यात्रेला गेले होते. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे, तब्येत उत्तम आहे आणि वाचनाचा छंद आहे. आयोजक शोध घेत आहेत, परंतु अजून तरी आमचे वडील सापडलेले नाहीत,” अशी प्रतिक्रिया शंकर बरकडे यांच्या मुलाकडून देण्यात आली.
Web Summary : A villager went missing during a candidate's pilgrimage to Ayodhya, causing concern. The organizer faces scrutiny for alleged safety oversights during the trip.
Web Summary : उम्मीदवार की अयोध्या तीर्थयात्रा के दौरान एक ग्रामीण लापता, जिससे चिंता फैल गई। आयोजक यात्रा के दौरान सुरक्षा में कथित चूक के लिए जांच के दायरे में।