पुणे : बाप-लेकीच हळवं आणि विश्वासाचं नातं नेहमीच अनुभवायला मिळतं. अशाच एका शेतकरी बापाने आपल्या ३३ वर्षीय विवाहीत मुलीला स्वत:ची किडनी देऊन जीवनदान दिले. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव व अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी रोग तज्ञ् डॉ. संदीप मोरखंडिकर यांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. महिला रुग्णासाठी जन्मदाता नवजीवनदाता ठरला आहे.
दोन्ही किडन्या खराब झाल्याने महिला वर्षभरापासून डायलिसिस उपचारावर होती. वैद्यकीय तपासणी नंतर ससूनचे किडनी रोग तज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडिकर यांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गरजेचे असल्याचे सांगितले होते. रुग्णाच्या कुटूंबियांशी किडनी दान व प्रत्यारोपण बाबत चर्चा केली. शेतकरी असलेले रुग्णाचे वडील हे स्वतः एक किडनी दान करण्यास तयार झाले. आवश्यक तपासण्या करून विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीने मान्यतेने शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेत नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. निरंजन आंबेकर व युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, वास्कुलर सर्जन डॉ. शार्दूल दाते, डॉ. हृषीकेश पारशी, भुलतज्ञ डॉ. सुरेखा शिंदे निवासी डॉक्टर, परिचारीकांचा महत्त्वाचा सहभाग होता. डॉ.किरणकुमार जाधव, प्रा. डॉ. लता भोईर व सत्यवान सुरवसे, अरुण बनसोडे यांनी समन्वयाची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली.
ससून रूग्णालयात सर्व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत अत्यंत कमी खर्चात केल्या जातात. योजने व्यतिरिक्त रुग्णांना उपलब्ध नसलेली औषधे, सिरिंज, सर्जिकल साहित्य व शस्त्रक्रियेनंतरच्या तपासण्यांचा खर्च करावा लागतो. योजने व्यतिरिक्त खर्चही सवलतीच्या दरात, औषधे, तपासण्या उपलब्ध करून दिल्या जातात. समाजसेवा अधीक्षकांमार्फत धर्मादाय संस्था,मनपा हद्दीतील रुग्णांना शहरी गरीब योजना व टाटा ट्रस्ट यांच्याद्वारे आर्थिक मदत मिळवून दिली जाते. शस्त्रक्रियेनंतर पुढील एक वर्षे औषधे जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत मिळतात. गरीब व गरजू रुग्णांनी किडनी व लिव्हर प्रत्यारोपणासाठी समाजसेवा अधिक्षकांशी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.