शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ऐन धामधुमीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेडचे ''सेनापती'' म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वेळ पडल्यास राजकारणातून निवृत्ती घेण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहिते पाटील यांना विश्वासात न घेता विरोधकांना पक्षात प्रवेश देण्याचे घाट रचत असल्याने हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. बुट्टे पाटील यांच्या पक्षप्रवेशाला आपला विरोध नाही असे मोहिते पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते सुधीर मुंगसे यांचाही अजित पवार गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी आपल्या विरोधात काम केले, त्यांनाच पक्षात घेतले जात असल्याने दिलीप मोहिते पाटील कमालीचे संतप्त झाले आहेत. "आम्हाला विश्वासात न घेता जर निर्णय होणार असतील, तर पक्षात राहण्यात काय अर्थ?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व घडामोडींमागे भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचे ''षडयंत्र'' असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. मोहिते पाटील यांना खिंडीत गाठून त्यांना भाजपमध्ये ओढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना मोहिते पाटील यांनी सध्या राजकीय संन्यासाची भूमिका घेतली असली, तरी त्यांनी पक्षबदलाची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही. यामुळे महायुतीत मोठी फाटाफूट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या वादामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अजित पवारांनी शरद बुट्टे पाटील यांना पक्षात घेऊन भाजपला धक्का दिला खरा, पण आता स्वतःच्याच माजी आमदारांची नाराजी दूर करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
"खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी स्वतः कायम संघर्ष करून कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. मात्र, ज्यांनी कायम विरोधात काम केले, त्यांनाच सन्मानाने पक्षात घेतले जात असेल, तर निष्ठेची किंमत काय? पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे मी व्यथित असून, जर हीच परिस्थिती राहिली तर मी राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्यास तयार आहे. - दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार
Web Summary : Ex-MLA Dilip Mohite Patil threatens political retirement due to Ajit Pawar's decisions. Internal conflict arises from inducting rivals, potentially benefiting BJP. Mohite Patil feels sidelined.
Web Summary : पूर्व विधायक दिलीप मोहिते पाटिल ने अजित पवार के फैसलों के कारण राजनीतिक संन्यास की धमकी दी। प्रतिद्वंद्वियों को शामिल करने से आंतरिक संघर्ष, संभावित रूप से भाजपा को लाभ। मोहिते पाटिल उपेक्षित महसूस कर रहे हैं।