सावरगाव (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज दिल्याची घटना समोर आली आहे. आकाश मीननाथ चव्हाण (वय २५ वर्ष ) या युवकाने दहा मिनिटे बिबट्याशी झुंज देत आपल्या आई, पत्नीला वाचवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडज गावठाण येथील आकाश मीननाथ चव्हाण (वय २५ वर्ष ) हा युवक आपली आई व पत्नीसह आपल्या जुन्या पण मोडकळीस आलेल्या घरात राहत होता. दि ७ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास आकाशच्या घराजवळ बिबट्या कुत्र्याची शिकार करण्यास आला होता. कुत्र्यांना बिबट्या आल्याची चाहूल लागली ते सावध झाले. परंतु कुत्र्याच्या लहान पिल्यामागे बिबट्या आला. पिल्ले पडक्या घराच्या भिंतीवर चढली. त्यांच्यामागे बिबट्याही भिंतीवर चढला. भिंतीवरून पिल्ले खाली उतरण्यास यशस्वी झाली. पण तेवढयात मातीच्या भिंतीवरुन बिबट्याचा पाय घसरला आणि तो थेट खाली घरात पडला. एका खोलीत आकाशची आई सविता चव्हाण झोपल्या होत्या. त्याच खोलीत बिबट्या त्यांच्या ऊशाजवळ पडला. दुसऱ्या खोलीत आकाश व त्याची पत्नी आरती झोपले होते. झोप लागत नसल्याने आकाश आपला मोबाईल हातात घेत टिव्ही ही पाहत होता. अचानकपणे काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने आई घाबरली.
प्रत्यक्षात बिबटया समोर उभा
आपल्या घराची भिंत कोसळली असे तिला वाटले. प्रत्यक्षात तर बिबट्या त्याच्या समोर उभा ठाकला होता. आईने मुलाला आवाज देऊन बिबट्या घरात घुसल्याचा व माझ्या उशाला बसल्याचे ओरडून सांगितले. आकाश बिबट्याला घरातून हूसकवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र तो बाहेर जात नव्हता तर घराच्या तुळईवरच ये - जा करीत होता. त्याला हुसकावण्याचा पुन्हा प्रयत्न केला असता त्यांनी थेट आकाशच्या अंगावर तळईवरून झेप घेतली व त्याच्यावर हल्ला केला. या दोघांच्या झुंजीत आकाशचे दोन्ही हात नकळत बिबट्याच्या जबड्यात गेले. घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पुन्हा तुळईवर जाऊन बसला. आकाशने प्रसंगावधान दाखवत तातडीने दरवाजा उघडून आपल्या आई व पत्नी यांना घराच्या बाहेर सुखरूप काढले आणि स्वतः हातात काठी घेऊन बिबट्याला सामोरे गेला. बिबट्याने पुन्हा आकाश वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आकाश व बिबट्या यांच्यात झुंज झाली. त्यात आकाशच्या हाताला बिबट्याचे दात लागले आणि आकाश जखमी झाला. दहा मिनिटे बिबट्याचा हा थरार घरात सुरू होता. शेवटी आकाशच्या हातातील काठीचा फटका बिबट्याला जोरात बसल्याने बिबट्या दरवाज्यातून बाहेर धुम ठोकून पळून गेला.
ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस सतर्क रहावे
दरम्यान बिबट्याने आमच्यावर हल्ला केला असा आरडाओरडा चव्हाण कुटुंबाने केल्याने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. तातडीने आकाश चव्हाण यांना पारुंडे येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले . या घटनेची सविस्तर माहिती वनविभागाला देण्यात आली . वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले . तसेच आकाश चव्हाण यांना पुढील उपचारासाठी जुन्नरच्या सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी बिबट्याला पकडण्यासाठी आकाशच्या घराजवळ पिंजरा लावला असून ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस सतर्क रहावे व विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
स्वतः च्या जीवाची परवा न करता आमचा जीव वाचविला
" माझा मुलगा आकाश हा दररोज रात्रपाळीला कामा निमित्त बाहेर जात असतो. दोन दिवसापासून त्याची तब्येत बरी नसल्याने तो कामावर गेला नाही. आज खंडेरायाच्या कृपेने तो घरी थांबला होता म्हणून माझी व सुनबाई आरती हिची या बिबट्याच्या हल्ल्यातून सही सलामत सुटका झाली. आकाश जर घरी थांबला नसता तर मात्र आमचे जीव वाचणे अशक्यच होते. आकाशने स्वतः च्या जीवाची परवा न करता आमचा जीव वाचविला ' - सविता चव्हाण ( आकाशची आई )